मुंबई : भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि मुंबईचे माजी उपमहापौर रमेश मेढेकर (६३) यांचे गुरुवारी मध्यरात्री निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन विवाहित मुली, पत्नी असा परिवार आहे.रमेश मेढेकर यांनी भाजपाच्या अखिल भारतीय मागासवर्गीय सेलचे महामंत्री म्हणून जबाबदारी सांभाळली होती. मुंबई भारतीय जनता युवा मोर्चाचेही ते अध्यक्ष होते. रोहिदास पंचायत, डेक्कन मर्चंट्स बँक, सुश्रूषा हॉस्पिटल, संत रोहिदास चर्मकार कल्याण महामंडळ आदी माध्यमातून त्यांनी सामाजिक क्षेत्रात लक्षणीय कार्य केले. कांदिवलीतील डहाणूकर वाडी स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या वेळी भाजपसह अन्य राजकीय पक्षांच्या नेते, कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. मेढेकर यांच्या निधनाने एक ध्येयसमर्पित व्यक्तिमत्त्व हरपले आहे. त्यांनी प्रतिकूल काळात पक्षासाठी दिलेले योगदान महत्त्वाचे आहे. त्यांच्या सर्वसमावेशकतेच्या धोरणाचाही पक्षाला मोठाच लाभ झाला. त्यांच्या निधनाने एक समर्पित आणि ध्येयनिष्ठ व्यक्तिमत्व हरपले आहे.- देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री माझ्या राजकीय वाटचालीत माझे खंदा सहकारी राहिलेले मेढेकर विपरित, सामाजिक, आर्थिक परिस्थितीतही अंगभूत गुणांमुळे समाजाच्या विकासासाठी झटत राहिले. ही त्यांची ओळख मुंबईकरांच्या कायम स्मरणात राहणार आहे. उपमहापौर म्हणून केलेल्या कामाप्रमाणेच चर्मोद्योग महामंडळाचे अध्यक्ष म्हणून १९९० च्या दशकातील त्यांची कारकीर्द आजही सर्वांच्या लक्षात आहे. - राम नाईक, राज्यपाल, उत्तर प्रदेश
माजी उपमहापौर रमेश मेढेकर यांचे निधन
By admin | Updated: November 21, 2015 02:51 IST