Join us
Daily Top 2Weekly Top 5

माजी क्रिकेटपटू संदीप पाटील यांनी दत्तक घेतला बिबट्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2019 02:44 IST

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. शैलेश पेठे यांनी सांगितले की

मुंबई : गेल्या सात वर्षांपासून संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातर्फे ‘वन्यप्राणी दत्तक योजना’ राबविली जात आहे. मंगळवारी माजी क्रिकेटपटू संदीप पाटील यांनी ‘तारा’ या मादी बिबट्याला दत्तक घेऊन तिचे पालकत्व स्विकारले आहे. ‘तारा’ २२ महिन्यांची आहे. संदीप पाटील यांनी ताराच्या औषधोउपचार व उदरनिर्वाहासाठी १ लाख २० हजार रुपयाची रक्कम उद्यान प्रशासनाकडे सुपुर्द केली आहे.

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. शैलेश पेठे यांनी सांगितले की, तारा अहमदनगर येथील आहे़ आईने तिला बेवारस सोडली. अहमदनगर वन विभागाने तिच्या संगोपणासाठी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या ‘बिबट निवारा केंद्रा’त तिला पाठविली. तिला नॅशनल पार्कात १९ डिसेंबर, २०१७ रोजी आणले गेले. बिबट निवारा केंद्रात तारा आणि सूरज अशी दोन भावंड एकत्र राहत होती. सप्टेंबर, २०१८ मध्ये सूरजचा मृत्यू झाला. ताराला मागच्या वर्षी अभिनेता सुमीत राघवन यांनी दत्तक घेतले होते.संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचे मुख्य वनसंरक्षक व संचालक अनवर अहमद म्हणाले की, महाराष्ट्र शासनाने २०१३ सालापासून प्राण्यांची दत्तक योजना अंमलात आणली. या योजनेंतर्गत बंदिस्त असलेल्या वन्यप्राण्यांच्या वर्षभरातील देखभाली खर्चाच्या रकमेप्रमाणे दत्तक घेता येते. त्या अनुषंगाने वाघ व सिंह ३ लाख १० हजार रुपये, बिबट्या १ लाख २० हजार रुपये, तसेच हरिण २० ते ४० हजार रुपये अशा प्रकारे दत्तक योजनेतून वन्यप्राण्यांना वर्षभरासाठी दत्तक घेतले जाते. काही वन्यप्राणी अजूनही आपल्या पालकांच्या शोधात आहेत. जास्तीतजास्त नागरिकांनी दत्तक योजनेचा लाभ घेऊन वन्यप्राणी संवर्धनासाठी हातभार लावावा. 

टॅग्स :बिबट्यामुंबई