Join us

राज्यात १५ जून ते ३० सप्टेंबरदरम्यान वनमहोत्सव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:07 IST

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : वृक्षलागवड व संगोपनाबद्दल जनतेला वनीकरणाचे महत्त्व पटवून देता यावे, या हेतूने राज्यात प्रतिवर्षाप्रमाणे १५ ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : वृक्षलागवड व संगोपनाबद्दल जनतेला वनीकरणाचे महत्त्व पटवून देता यावे, या हेतूने राज्यात प्रतिवर्षाप्रमाणे १५ जून ते २६ सप्टेंबरदरम्यान वनमहोत्सवाचे आयोजन केले आहे. या कालावधीत वनविभागातर्फे सवलतीच्या दरात रोपे पुरविण्यात येणार आहेत.

या महोत्सवांतर्गत खासगी मालकीचे पडीत क्षेत्र आणि शेताच्या बांधावर, रेल्वे, कालव्याच्या दुतर्फा तसेच रस्त्याच्या दुतर्फा, सामूहिक पडीत क्षेत्र व गायरान क्षेत्रावर मोठ्या प्रमाणात वृक्षलागवडीचा कार्यक्रम हाती घेण्यात येईल. सर्वसाधारण कालावधीत ९ महिन्यांचे रोप (लहान पिशवीतील रोप) २१ रुपयांना, तर १८ महिन्यांचे रोप (मोठ्या पिशवीतील रोप) हे ७३ रुपयांना एक याप्रमाणे देण्यात येते. परंतु या वनमहोत्सवाच्या काळात ९ महिन्यांचे रोप केवळ १० रुपयांना, तर १८ महिन्यांचे मोठ्या पिशवीतील रोप ४० रुपयांना एक याप्रमाणे विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात येईल. पावसाळ्यात १५ जून ते ३० सप्टेंबर या काळात वृक्षलागवडीसाठी सर्व शासकीय यंत्रणा व आस्थापना तसेच निमशासकीय यंत्रणा व नागरिकांना वृक्षलागवड कार्यक्रमात मोठ्या प्रमाणात सहभागी करून घेण्यात येईल. ज्या शासकीय यंत्रणांना वृक्षलागवड करायची आहे त्यांना रोपनिर्मितीसाठी कोणत्याही प्रकारची तरतूद नसल्यास रोपांचा मोफत पुरवठा करण्यात येईल. यासाठी त्यांनी लागणाऱ्या रोपांची आगाऊ मागणी, नजीकचे उपवनसंरक्षक किंवा विभागीय वन अधिकारी, सामाजिक वनीकरण विभाग यांच्याकडे पत्राद्वारे करावी. या योजनेचा लाभ सर्वसामान्य जनता, शेतकरी, विद्यार्थी, निसर्गप्रेमींनी घ्यावा, असे आवाहन वनविभागाने केले आहे.

..............................................