Join us

वृक्ष तोडप्रकरणी वनविभाग सरसावला

By admin | Updated: December 14, 2014 23:12 IST

एक्स्प्रेस-वेवरील धामणी गावाच्या हद्दीत जाहिरातबाजीसाठी अनधिकृतपणे झालेले वृक्षतोड प्रकरण चव्हाट्यावर आल्याने वन विभाग कारवाईसाठी कामाला लागला आहे.

खालापूर : एक्स्प्रेस-वेवरील धामणी गावाच्या हद्दीत जाहिरातबाजीसाठी अनधिकृतपणे झालेले वृक्षतोड प्रकरण चव्हाट्यावर आल्याने वन विभाग कारवाईसाठी कामाला लागला आहे. येथे बेसुमार वृक्षांची कत्तल झाल्याने पर्यावरणप्रेमींत संतापाचे वातावरण असून वन विभागासह महसूल, पोलीस विभागाने दोषींवर कठोर कारवाईची मागणी करण्यात आली आहे. वन विभागाने या प्रकरणी कारवाईला सुरुवात केली आहे. एमएसआरडीसीसह आयआरबी, डेल्टा सर्विस अधिकारी, कर्मचाऱ्यांचे जबाब नोंदविण्याचे काम सुरू झाले आहे. मुंबई - पुणे एक्स्प्रेस-वेवर खालापूर टोल नाक्याजवळील धामणी गावाच्या परिसरात पुणे मार्गावर बेसुमार खैर, कांचन, सुबाभूळ, उंबर अशा शेकडो झाडांची कत्तल केली आहे. एक्स्प्रेस-वेवर दोन्ही मार्गांवर रस्त्याच्या बाजूला मोठमोठे जाहिरातींचे फलक उभारण्यावर व्यावसायिक कंपन्यांत जणू स्पर्धाच लागली आहे. जाहिरातबाजी करणाऱ्या व्यावसायिकांच्या हितासाठी अनेकदा बेदिक्कत पर्यावरणाचे सर्व नियम डावलून वृक्षतोड करण्यात येत आहे. धामणी गाव या ठिकाणी कटरच्या साहाय्याने वृक्षांची तोड केल्याने पर्यावरणप्रेमींनी कारवाईसाठी आपले निवेदन संबंधित शासकीय विभागाला दिले आहे. वृक्षांच्या कत्तलीचे वृत्त प्रसिद्ध होताच खालापूर वन क्षेत्रपाल के. आर. सोनावणे, वनपाल जगदीश म्हात्रे व अन्य कर्मचायांनी प्रत्यक्ष जागेवर जाऊन याची पाहणी केली.महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने आयआरबी कंपनीला काही वर्षांसाठी बीओटी तत्त्वावर जागा दिल्याने रस्त्यासह उर्वरित सर्वच जागेवर कसल्याही प्रकारचे अतिक्र मण अथवा वृक्षतोड व उत्खननबाबत आयआरबीच्या संबंधितांची जबाबदारी आहे. चार दिवस वृक्षतोड होत असताना आयआरबीसह इतर सुरक्षा यंत्रणा काय करीत होत्या, असा सवाल पर्यावरणप्रेमींनी उपस्थित केला आहे. (वार्ताहर)