मनोहर कुंभेजकर, लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: सध्या मुंबईत कोवीड व एच 3एन 2 चे रूग्ण मोठ्या संख्येने वाढत असून मुंबई महानगर पालीका आपल्या परीने प्रयत्न करीत आहेत.मात्र कोविड संदर्भात टेस्टिंग, ट्रॅकिंग आणि ट्रेसिंग ही त्रीसूत्री तसेच कोविड रुग्ण आयसोलेशन व क्वारंटाईन पाळत नाही.तसेच मुंबईकरांच्या मनात कोवीडची भीती राहीली नसल्याने अपेक्षित कोवीड अट्रीब्युटेड बिहेव्हीयर ते पाळत नाही. या पार्श्वभूमीवर राज्याचे माजी आरोग्य मंत्री व शिंदे गटाचे उपनेते डॅा. दीपक सावंत यांनी पालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॅा. संजीव कुमार यांची काल सायंकाळी अंधेरी (पूर्व ) येथील पालिकेच्या के (पूर्व ) विभाग कार्यालयात भेट घेऊन महत्वाच्या सूचना केल्या.
कोवीड व एच3एन2 संदर्भात आपण बैठक बोलवावी अशी विनंती त्यांनी पालिका आयुक्त डॉ.इकबालसिंह चहल यांच्या कडे केली होती.त्यामुळे त्यांनी अतिरिक्त आयुक्तांना सदर बैठक आयोजित करावी असे सांगितल्याची माहिती डॅा. दीपक सावंत यांनी लोकमतला दिली.यावेळी पालिका उपायुक्त रणजित ढाकणे,पालिका उपायुक्त विश्वास शंकरवार,के पूर्वचे सहाय्यक आयुक्त मनीष वळुंज, एच पश्चिमचे विनायक विसपुते, के पश्चिमचे सहाय्यक आयुक्त डॉ.पृथ्वीराज चव्हाण, आर मध्यच्या संध्या नांदेडकर आदी विभागीय कार्यालयांचे सहाय्यक आयुक्त उपस्थित होते.
पालिका प्रशासनाला मुंबईत मास्क सक्ति जरी करता येत नसली तरी फक्त हॉस्पिटलमध्ये मधे मास्क वापरा हे सांगून चालणार नाही,तर जिथे जास्त संपर्क येऊ शकेल अशा ठिकाणी अनांऊसमेट विविध माध्यमातून करून लोकजागरण होणे गरजेचे आहे.तसेच लसीकरणाची टक्केवारी घसरली असून बूस्टर डोस घेण्यासाठी नागरिक तयार नाहीत. लसीकरणाचे फायदे व त्याची परिणाम कारकता ६/८ महिनेच राहू शकते. त्यामुळे वॅक्सीन घेणे आवश्यक आहे याबाबत प्रसिद्धी माध्यमातून वॅक्सीनचा तुटवडा हे डॅा दीपक सावंत यांनी लक्षात आणून दिले असता पण आपण वॅक्सीनचा पुरवठा करण्यासाठी केंद्राकडे मागणी केली असे डॅा संजीव कुमार यांनी सांगितले. मात्र वॅक्सीन शिवाय जेष्ठ नागरिक सहव्याधीअसलेले याना संसर्ग पासून दूर ठेवणे कठीण आहे. तसेच एच3एन2 साठी बायोफायर टेस्ट सेव्हन हिल्स येथे सुरू करण्यासाठी १ कोटी रूपयाची गरज आहे तो निधी महानगर पालीकेने लवकर उप लब्ध करून द्यावा. तसेच इतर रूग्णालयात ही सुविधा उपलब्ध करावी अशी आग्रही सूचना डॅा सावंत यांनी केली.
आपला दवाखाना ही संकल्पना मुंबईत अद्याप सर्वठिकाणी सुरू झालेली नाही,तेथे औषधाचा तुटवडा असून १५० औषधापैकी ३० ते ४० औषधे उपलब्ध आहेत, याकडेही त्यांनी पालिका प्रशासनाचे लक्ष वेधले.विलेपार्ले, सांताक्रुज, अंधेरी पूर्व व पश्चिम, भांडूप,मुलुंड, कुर्ला येथे व्यवस्था होणे आवश्यक असल्याचे त्यांनी निदर्शनास आणले.