Join us  

अंधेरीच्या गोखले पुलाचे जड झाले ओझे ! 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2024 9:46 AM

मुंबईतील उड्डाणपूल आणि त्यांची डागडुजी मुंबई महापालिकेपुढे डोकेदुखी ठरू लागली आहे.

मुंबई : मुंबईतील उड्डाणपूल आणि त्यांची डागडुजी मुंबई महापालिकेपुढे डोकेदुखी ठरू लागली आहे. अंधेरीचा गोखले पूल, दादरचा टिळक पूल या दोन पुलांच्या  बांधकामामुळे पालिकेला टीका सहन   करावी लागत आहे. भरीस भर म्हणून आता पुलांच्या  बांधकामाच्या अवाढव्य खर्चाची भर पडली आहे. एमएमआरडीएकडून हस्तांतरित झालेल्या पुलांची जबाबदारी पालिकेकडे आल्यानंतर या पुलांच्या  देखभालीसाठी मोठी आर्थिक तरतूद करावी लागत आहे.

मुंबईतील पूर्व आणि पश्चिम द्रुतगती महामार्गावरील पूल आधी एमएमआरडीएच्या ताब्यात होते. त्यानंतर ते पालिकेकडे हस्तांतरित झाले. त्यापूर्वी एमएमआरडीए पुलांच्या  देखभालीचा खर्च उचलत होते. आता खर्चाची बाब पालिकेकडे आली आहे. 

अंधेरी पूर्वेकडील उड्डाणपुलाची दुरुस्ती पालिका करणार आहे. त्यासाठी १०० कोटी रुपये खर्च होणार आहेत. दुरुस्तीच्या कामासाठी याच महिन्यात निविदा मागवण्यात आल्या आहेत. दुरुस्तीसाठी एवढा खर्च येणार असल्याने यापूर्वी एमएमआरडीएने या पुलाची डागडुजी केली होती की नव्हती, यावर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.

सर्वेक्षणानंतर इतर कामांची भर -

१) २००४ मध्ये अंधेरी पूल ते जेव्हीएलआर जंक्शनपर्यंत डांबरीकरणाचे काम तेवढे झाले होते. त्यासाठी २४ कोटी खर्च केले होते. हे काम एमएमआरडीएने केले होते. 

२) डांबरीकरणाव्यतिरिक्त दुरुस्तीची अन्य कामे झालेली नाहीत. हा पूल युती सरकारच्या काळात बांधण्यात आला होता. गोल्डस्पॉट, चकालासह एकूण तीन सिग्नल पार करणारा हा मोठा पूल आहे. 

३)  एमएमआरडीएकडून पूल ताब्यात घेतल्यानंतर पालिकेच्या पूल विभागाने पुलाचे सर्वेक्षण करून बेअरिंग व अन्य कामे सुचवली आहेत.

टॅग्स :मुंबई महानगरपालिकाअंधेरी