प्रशांत शेडगे, पनवेल - सध्या सुरू असलेल्या लग्नसमारंभाच्या कालावधीत फुलांची आवक घटल्याने व बाहेरील जिल्ह्यातून आयात करण्यात येत असल्याने हारांसह फुलांच्याही किमतीत वाढ झाली आहे. ऐन लग्नसराईत ही वाढ झाल्याने सर्वसामान्यांना आर्थिक झळ सहन करीत हारांची खरेदी करावी लागत असल्याचे दिसत आहे. फुलांचा मुख्य बाजार असलेल्या दादर येथील बाजारपेठेत फुलांची टंचाई निर्माण झाली आहे. अल्पप्रमाणातील पाऊस आणि पाण्याची टंचाई यामुळे घाटमाथ्यावरील शेतकर्यांकडून मिळणारा माल मिळेनासा झाला आहे. त्यामुळे फुलविक्रेत्यांच्या नाकीनऊ आले आहे. यावर सर्वोत्तम पर्याय म्हणून आर्टिफिशियल फुले जवळ करणार्यांची संख्या वाढलेली आहे. वधू-वरांच्या हारांची किंमत हजारांच्या घरात गेली आहे. सत्काराचा हार ५० रूपये, गजरा १८ ते २० रूपये, बुके २०० रूपयांच्या पुढे विकले जात आहेत. वधू-वरांची गाडी सजवण्याकरिता १०५१ रूपयांपासून २५०० रूपयांपर्यंत रक्कम घेतली जात आहे. गुलाबाचे एक फुल पाच ते सात रूपयाला विकले जात आहे. काही दिवसांपूर्वी ५० रूपये किलोने मिळणारा झेंडूचा दर १०० रूपयांवर पोहचला आहेत. मोगरा १६० रूपयांवर पोहचला असल्याचे नरेंद्र घोमटक या विक्रेत्याने सांगितले.
लग्नसराईमुळे पनवेल परिसरात फुलांचे भाव वधारले
By admin | Updated: May 16, 2014 02:03 IST