Join us

कल्याण-डोंबिवलीत कचऱ्याचा महापूर

By admin | Updated: March 30, 2015 00:07 IST

सर्वत्र स्वच्छता अभियानांतर्गत साफसफाईचे आवाहन केले जात असताना कल्याण-डोंबिवली शहरांत मात्र जागोजागी कच-याचे ढीग साचले आहेत.

कल्याण : सर्वत्र स्वच्छता अभियानांतर्गत साफसफाईचे आवाहन केले जात असताना कल्याण-डोंबिवली शहरांत मात्र जागोजागी कच-याचे ढीग साचले आहेत. स्वच्छता अभियानांतर्गत साचलेल्या कचऱ्याच्या तक्रारींसाठी बनविलेले मोबाइल अ‍ॅप्सदेखील कुचकामी ठरल्याने शहरांमध्ये रोगराईला पोषक वातावरण निर्माण झाले आहे.कल्याण-डोंबिवली महापालिकेचे सात प्रभाग आहेत. यातील ड आणि ह या प्रभागांतील कचरा खाजगी ठेकेदारांमार्फत उचलला जातो. उर्वरित अ, ब, क, फ आणि ग अशा पाच प्रभागांमध्ये निर्माण होणारा कचरा महापालिकेच्या कर्मचाऱ्यांमार्फत उचलला जातो. दरम्यान, स्वच्छता अभियानाच्या माध्यमातून सर्वत्र जनजागृती केली जात असताना स्वत:कडून केल्या जात असलेल्या साफसफाईचा केडीएमसीला मात्र विसर पडला आहे. रविवारी शहरातील कचरा उचलला न गेल्याने जागोजागी कचऱ्याचे ढीग जमा झाल्याचे चित्र दिसून आले. कल्याण शहरातील मनीषानगर, महावीर जैन शाळा, ठाणकरपाडा, दूधनाका, गांधी चौक, खडकपाडा सर्कल तर डोंबिवलीतील नवापाडा, महात्मा फुले रोड या ठिकाणी साचलेल्या कचऱ्याने रोगराईला एक प्रकारे आमंत्रण मिळाले आहे. विशेष बाब म्हणजे महापालिका क्षेत्रात आढळून आलेल्या स्वाइन फ्लूच्या रुग्णांपैकी सर्वाधिक रुग्ण हे खडकपाडा या विभागातील होते. त्या विभागातही कचऱ्याचे साचलेले ढीग पाहता अन्य रोगांचा प्रादुर्भाव होण्याची भीती तेथील रहिवाशांनी व्यक्त केली आहे. त्यावर नगरसेवक मात्र मौनीबाबा होणे पसंत करीत आहेत.(प्रतिनिधी)