Join us
Daily Top 2Weekly Top 5

मुंबई विद्यापीठात विमान उड्डाणाचे धडे

By admin | Updated: March 24, 2017 01:21 IST

पारंपरिक शिक्षणाबरोबर व्यवसायाभिमुख शिक्षणाची कास धरणाऱ्या मुंबई विद्यापीठाने व्यवसायाभिमुख अभ्यासक्रम

मुंबई : पारंपरिक शिक्षणाबरोबर व्यवसायाभिमुख शिक्षणाची कास धरणाऱ्या मुंबई विद्यापीठाने व्यवसायाभिमुख अभ्यासक्रम आणि नावीन्यपूर्ण शिक्षणक्रमाच्या जोडीला एक पाऊल पुढे टाकत विद्यापीठाच्या गरवारे इन्स्टिट्यूट आॅफ करिअर एज्युकेशन येथे शैक्षणिक वर्ष २०१६-१७ पासून द्विपदवी अभ्यासक्रमाला सुरुवात होत आहे. यासाठी गुरुवारी गरवारे इन्स्टिट्यूट आॅफ करिअर एज्युकेशन आणि पवन हंस लिमिटेड यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला आहे. या करारान्वये मुंबई विद्यापीठातर्फे बीएस्सी एरॉनॉटिक्स आणि पवन हंसतर्फे एअरक्राफ्ट मेंटेनन्स इंजिनीअरिंग ही पदवी देण्यात येणार आहे. या अभ्यासक्रमाला प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांना द्विपदवी मिळणार आहे. मुंबई विद्यापीठाच्या विद्यानगरी संकुलातील अल्केश दिनेश मोदी व्यवस्थापन संस्थेत पार पडलेल्या या कार्यक्रमाला मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय देशमुख, डॉ. बी.पी. शर्मा, अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक पवन हंस लिमिटेड, एअर कमांडर टी.ए. दयासागर आणि गरवारे इन्स्टिट्यूटचे संचालक डॉ. अनिल कर्णिक यांच्यासोबत अनेक मान्यवर उपस्थित होते.मुंबई विद्यापीठात आजमितीस काही संस्थांमध्ये बीएस्सी एरॉनॉटिक्स हा अभ्यासक्रम शिकविला जातो. तर आता याच जोडीला कौशल्य आधारित शिक्षणाची जोड देण्यासाठी पवन हंस हेलिकॉप्टर इन्स्टिट्यूट यांनी पुढाकार घेऊन गरवारे इन्स्टिट्यूट आॅफ करिअर एज्युकेशन संस्थेसोबत सामंजस्य करार करून या द्विपदवी अभ्यासक्रमाची मुहूर्तमेढ रोवली आहे. या अभ्यासक्रमासाठी १२ वी विज्ञान उत्तीर्ण (भौतिकशास्त्र आणि गणित) पात्रता असून या अभ्यासक्रमासाठी ६० प्रवेश क्षमता आहे. हा तीन वर्षांचा पूर्णवेळ अभ्यासक्रम असणार आहे. (प्रतिनिधी)