Join us
Daily Top 2Weekly Top 5

बोर्डिंगमध्ये न जाण्यासाठी फैजलने केले होते पलायन

By admin | Updated: April 28, 2017 01:01 IST

पालक आपल्याला बोर्डिंगमध्ये घालणार आहेत, याच भीतीने घरातून वारंवार धूम ठोकलेल्या १३ वर्षीय फैजलला शोधून ठाणे पोलिसांच्या चाइल्ड

पंकज रोडेकर / ठाणेपालक आपल्याला बोर्डिंगमध्ये घालणार आहेत, याच भीतीने घरातून वारंवार धूम ठोकलेल्या १३ वर्षीय फैजलला शोधून ठाणे पोलिसांच्या चाइल्ड प्रोटेक्शन युनिटने पालकांच्या स्वाधीन केले आहे. मात्र, धूम ठोकताना तो राहत असलेला परिसर सोडून जात नसल्याचे समोर आले आहे. यापुढे त्याने पळून जाऊ नये, यासाठी त्याचे समुपदेशन करून तशी हमीही त्याने पोलिसांना दिल्याचे सूत्रांनी सांगितले.फैजल (१३) हा दोन लहान भाऊ, बहीण आणि आई-वडिलांसह मुंब्य्रात राहत आहे. त्याचे वडील जरी कामगार असून आई एका कॅटरिंगमध्ये काम करते. कामानिमित्त दोघांनाही वारंवार बाहेर जावे लागत असल्याने मोठ्या मुलाने (फैजल) चांगले शिकावे, यासाठी त्यांनी त्याला बोर्डिंगला टाकण्याचा निर्णय घेतला. ही माहिती फैजलला समजली. मात्र, तेथे जायचे नसल्याने तो नाराज झाला होता. याचदरम्यान, त्याने घरातून अचानक कोणालाही न सांगता ९ एप्रिल रोजी पळ काढला. याचदरम्यान त्याच्या पालकांनी मुंब्रा पोलीस ठाण्यात मुलगा हरवल्याची तक्रार केली. या प्रकरणी अपहरणाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर स्थानिक पोलीस आणि ठाणे चाइल्ड प्रोटेक्शन युनिट यांच्या संयुक्त रीतीने तपास सुरू झाला. सहायक पोलीस आयुक्त भरत शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक वाय.एस. सोनावणे यांच्या पथकातील ए.ए. शेख आणि पोलीस नाईक कैलास जोशी यांनी शोधकार्य सुरू केले. याचदरम्यान फैजलला बाहेर फिरण्याची सवय असल्याची माहिती पुढे आली होती. त्यानुसार, मुंब्रा परिसरात शोध घेतला असता तो १३ एप्रिल रोजी सापडला. तेव्हा तो आजारी असल्याने त्याला पालकांच्या हवाली केले. पण, त्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे १४ एप्रिल रोजी पुन्हा घरातून निघून गेल्याची माहिती पालकांनी पोलिसांना दिली. त्यानुसार, पुन्हा त्याचा शोध सुरू असताना तो १८ एप्रिल रोजी पोलिसांना सापडला. त्या वेळी त्याने आपल्याला बोर्डिंगला जायचे नसल्याने पळून जात असल्याचे सांगितले. त्यानुसार, त्याचे तज्ज्ञांमार्फत समुपदेशन करून पालकांच्या हवाली केल्याची माहिती पोलिसांनी दिली.