Join us
Daily Top 2Weekly Top 5

पंचतारांकित हॉटेल, प्रदर्शन परिसरात कोरोना नियमांना केराची टोपली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2021 04:06 IST

मुंबई : कोरोनाच्या समूळ उच्चाटनासाठी राज्य सरकारने ब्रेक द चेन अंतर्गत जे आदेश दिले आहेत, त्या आदेशानुसार, लेव्हल तीनमध्ये ...

मुंबई : कोरोनाच्या समूळ उच्चाटनासाठी राज्य सरकारने ब्रेक द चेन अंतर्गत जे आदेश दिले आहेत, त्या आदेशानुसार, लेव्हल तीनमध्ये वीकएंडला ज्या सेवा अत्यावश्यक नाहीत, अशा दुकानांना परवानगी देण्यात आली नाही. मात्र, सरकारी आदेशाला केराची टोपली दाखविण्यात आली असून, पंचतारांकित हॉटेलमध्येदेखील सरकारी आदेशांना हरताळ फासला जात आहे.

पंचतारांकित हॉटेल, बँक्वेट हॉल, सर्व प्रदर्शन परिसरात सरकारी आदेशांचे, नियमांचे उल्लंघन केले जात आहे. शनिवारी आणि रविवारी व्यापार करण्यास परवानगी नाही. बँक्वेट हॉलमध्ये यास परवानगी नाही. मात्र, आदेशाला हरताळ फासला जात आहे. प्रशासनाला याबाबत माहिती असूनदेखील काहीच कारवाई होत नसल्याचे चित्र आहे. मुंबई लेव्हल तीनमध्ये असूनदेखील मुंबईत ठिकठिकाणी प्रदर्शन सेंटर सुरू आहेत. तर, दुसरीकडे दुकाने एक महिन्यापासून बंद आहेत. दुकानदारांचे हजारो कोटींचे नुकसान झाले आहे.

मुंबई शहर आणि उपनगरांत याच पद्धतीने कोरोना नियमांचे उल्लंघन झाले, तर आरोग्याच्या समस्या पुन्हा निर्माण होतील. परिणामी, यावर काळजी म्हणून योग्य ती कार्यवाही करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत मुंबई महापालिकेने यात लक्ष घालावे, अशा आशयाचे पत्र त्यांना देण्यात आले आहे, अशी माहिती फेडरेशन ऑफ रिटेल ट्रेडर्स वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष वीरेन शाह यांनी प्रसारमाध्यमांना दिली.