Join us
Daily Top 2Weekly Top 5

पंचतारांकित मुख्यालयाच्या काचेला तडे

By admin | Updated: July 12, 2015 01:04 IST

महापालिकेच्या मुख्यालयामधील काचांना तडे जाऊ लागले आहेत. शुक्रवारी दुसऱ्या मजल्यावरील संरक्षण कठड्याची काच तुटून खाली पडली.

नवी मुंबई : महापालिकेच्या मुख्यालयामधील काचांना तडे जाऊ लागले आहेत. शुक्रवारी दुसऱ्या मजल्यावरील संरक्षण कठड्याची काच तुटून खाली पडली. आतापर्यंत ही तिसरी घटना असून काचांच्या दर्जाविषयी संशय व्यक्त केला असून नागरिकांची सुरक्षा धोक्यात आली आहे. पामबीच रोडवर महापालिकेने १९५ कोटी रुपये खर्च करून भव्य मुख्यालय बांधले आहे. अनेक जण मुख्यालयाची तुलना मॉल व पंचतारांकित हॉटेलशी केली जात आहे. मुख्यालयास बांधकामासाठी गोल्ड मानांकनही मिळाले आहे. मुख्यालय दिसायला आकर्षक असले तरी आतमधील समस्या वाढू लागल्या आहेत. इमारतीमध्ये काचेचा मोठ्या प्रमाणात वापर करण्यात आला आहे. अधिकाऱ्यांची दालने, प्रवेशद्वार, बाहेरील लॉबीमधील संरक्षण रेलिंग सर्व ठिकाणी काचा बसविण्यात आल्या आहेत. काचांना अचानक तडे जाण्याचे प्रकार वाढू लागले आहेत. शुक्रवारी दुसऱ्या मजल्यावरील काच तुटून खाली पडली. खालून चालणारे दोन नागरिक थोडक्यात बचावले. यापूर्वीही अशाप्रकारच्या घटना घडल्या आहेत. तळमजल्यावर मालमत्ता विभागाच्या प्रवेशद्वाराची काच तुटली होती. जनसंपर्क कार्यालयामधील काचही तुटली होती. मोठ्या अपघाताची शक्यता पालिकेतील काचांना वारंवार तडे जात आहेत. दुसऱ्या व तिसऱ्या मजल्यावरील काचा खाली पडून कर्मचारी व नागरिक गंभीर जखमी होण्याची किंवा जीवितहानी होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. काचांना टेकून उभे राहिले व अचानक काच तुटली तर तोल जाऊन खाली पडण्याची भीतीही व्यक्त केली जात आहे.