Join us  

प्रेरणादायी कहाणी; 'सेव्हन स्टार'मध्ये शेफ असलेला मराठी तरुण रस्त्यावर विकतोय बिर्याणी!

By सायली शिर्के | Published: December 28, 2020 12:15 PM

Akshay Parkar Biryani House : प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर सर्वकाही साध्य होतं हे मुंबईच्या मराठमोळ्या तरुणाने सिद्ध करून दाखवलं आहे.

मुंबई - जगभरात कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. मात्र लॉकडाऊनचा फटका हा सर्वच क्षेत्रांना बसला आहे. हजारो लोकांना आपला रोजगार गमवावा लागला आहे. तर हातावर पोट असणाऱ्यांची देखील आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट झाली आहे. अनेकांची नोकरी गेली आहे. मात्र याच दरम्यान प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर सर्वकाही साध्य होतं हे मुंबईच्या मराठमोळ्या तरुणाने सिद्ध करून दाखवलं आहे. लॉकडाऊनमध्ये नोकरी गमावणाऱ्या मराठमोळ्या शेफने आपल्या जिद्दीच्या जोरावर कोरोनाच्या संकटात रस्त्यावर स्वत:ची बिर्याणी सुपरहिट करून दाखवली आहे. 

अक्षय पारकर असं या तरुणाचं नाव असून त्याने स्वत:चं बिर्याणी हाऊस सुरू केलं आहे. अक्षय 5 स्टार आणि 7 स्टार हॉटेल्समध्ये शेफ म्हणून काम करायचा. Taj Sats हॉटेलसारख्या 7 स्टार हॉटेल्स आणि इंटरनॅशनल क्रूझवर 8 वर्षे शेफ म्हणून काम केलेल्या अक्षयला लॉकडाऊनमुळे आपली नोकरी गमवावी लागली. मात्र परिस्थितीसमोर हार न मानता त्याने जिद्दीच्या जोरावर "पारकर्स बिर्याणी हाऊस"ची सुरुवात केली आहे. कोरोना काळात अनेक संकटांचा सामना करत अक्षयने आता व्हेज आणि नॉनव्हेज बिर्याणीचा स्टॉल टाकून स्वतःचा छोटासा व्यवसाय सुरू केला आहे. 

29 वर्षांच्या अक्षयने दहा हजार रुपये इन्व्हेस्ट करून "पारकर्स बिर्याणी हाऊस"ची सुरुवात केली आहे. पाच किलो बिर्याणीपासून त्याने सुरुवात केली आणि आता दररोज सात किलो बिर्याणीची विक्री होत आहे. दहा वाजता बिर्याणी तयार करण्यास सुरुवात केली जाते आणि एक वाजता ती विक्रीसाठी आणली जाते. बिर्याणी घेण्यासाठी लोकांच्या लांबच लांब रांगा लागतात. शिवाजी मंदिर समोरील फूटपाथवर पारकर बिर्याणी हाऊसचा स्टॉल लावला जातो.

"स्वत: वर विश्वास ठेवा, सकारात्मक प्रतिसाद मिळेल, नक्कीच यशस्वी व्हाल" असा सल्ला अक्षय पारकरने तरुणाईला दिला आहे. अक्षयचा हा प्रवास @Beingmalwani या फेसबुक पेजने आपल्या एका पोस्टद्वारे शेअर केला होता. त्यानंतर ही पोस्ट सोशल  मीडियावर जोरदार व्हायरल झाली. अक्षयच्या जिद्दीचं आणि धाडसाचं सर्वत्र भरभरून कौतुक केलं जात आहे. कोरोनाच्या काळात नोकरी गेल्यामुळे तणावात असलेल्या अनेकांसाठी तसेच नवीन काहीतरी करू पाहणाऱ्या तरुणांसाठी त्यांची ही कहाणी नक्कीच प्रेरणादायी आहे. 

टॅग्स :कोरोना सकारात्मक बातम्यामहाराष्ट्रात कोरोना व्हायरसमुंबईअन्न