मुंबई : बस थांबे अतिक्रमणमुक्त ठेवण्यासाठी महापालिकेने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. त्यानुसार, ‘बेस्ट’ बस थांब्यांच्या दोन्ही बाजूंना ५० मीटरप्रमाणे एकूण १०० मीटरच्या परिसरात र्पाकिंगवर बंदी आणली आहे. त्यामुळे बस गाड्या थांब्यापर्यंत आणणे शक्य होणार असून, प्रवाशांची गैरसोयही दूर होईल. आर्थिक मुदतीनंतर महापालिकेने बेस्ट उपक्रमाला दिलेली ही मोठी भेट आहे. त्याचबरोबर, मुंबईतील महत्त्वाचे पाच रस्ते येत्या शुक्रवारपासून प्रायोगिक तत्त्वावर पार्किंगमुक्त करण्यात येणार आहेत.
मुंबईतील पार्किंगला शिस्त लावण्यासाठी महापालिकेने ७ जुलैपासून सार्वजनिक वाहनतळाच्या पाचशे मीटर परिसरात अनधिकृत पार्किंग करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई सुरू केली आहे. यामुळे सार्वजनिक वाहनतळांवर गाड्या उभ्या करण्याचे प्रमाण वाढले आहे. या मोहिमेच्या दुसºया टप्प्यात आता मुंबईतील पाच महत्त्वाचे रस्ते पार्किंगमुक्त करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. यात दक्षिण मुंबईतील महर्षी कर्वे मार्ग व गोखले मार्ग, पूर्व उपनगरातील लाल बहादूर शास्त्री मार्ग आणि पश्चिम उपनगरातील स्वामी विवेकानंद मार्ग व न्यू लिंक रोड या रस्त्यांच्या सुमारे १४ कि.मी. अंतराच्या रस्त्याच्या दोन्ही बाजू ‘पार्किंगमुक्त’ असतील.
अखेर पालिका आयुक्तांनी बस थांब्यांच्या दोन्ही बाजूच्या टोकांपासून ५० मीटर असे एकूण १०० मीटरपर्यंत पार्किंगबंदीची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे आदेश सर्व २४ विभागांच्या सहायक आयुक्तांना दिले आहेत.अनधिकृत पार्किंग रोखण्याचा प्रयत्नपहिल्या टप्प्यात ७ जुलै, २०१९ पासून महापालिकेच्या २६ सार्वजनिक वाहनतळांलगतच्या ५०० मीटर अंतराच्या परिसरात ‘नो पार्किंग’ लागू करण्यात आले आहे. रस्त्यावरील अनधिकृत पार्किंगवर वाहतूक पोलिसांच्या सहकार्याने दंडात्मक कारवाई सुरू करण्यात आली आहे. पुढच्या टप्प्यात महत्त्वाच्या पाच रस्त्यांच्या काही भागात दुतर्फा ‘नो पार्किंग’ची आणि बेस्ट बस थांब्यांच्या दोन्ही बाजूंना ५० मीटर अंतरापर्यंत ‘नो पार्किंग’ची अंमलबजावणी शुक्रवार, ३० आॅगस्ट, २०१९ पासून करण्यात येणार आहे.