Join us  

राज्यातील ५६ जण कोरोना निगेटिव्ह

By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2020 5:47 AM

मुंबई बंदरावर काल दाखल झालेल्या फिलिपाइन्सच्या एमव्ही बौडिका या जहाजावरील

मुंबई : कोरोना विषाणूंच्या संसर्गाच्या शक्यतेवरून राज्यात विलगीकरण कक्षात दाखल झालेल्या ५६ रुग्णांचे प्रयोगशाळा नमुने निगेटिव्ह आल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. राज्यातील वेगवेगळ्या रुग्णालयांतील विलगीकरण कक्षात आतापर्यंत ६० जणांना भरती करण्यात आले होते. त्यापैकी ५० जणांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. सध्या मुंबई, सांगली आणि पुण्यातील कक्षात प्रत्येकी तीन रुग्ण भरती आहेत. आतापर्यंत मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर ३६ हजार २८ प्रवाशांना तपासण्यात आले. कोरोना बाधित भागातून आलेल्या प्रवाशांचा शोध क्षेत्रीय सर्वेक्षणातूनही घेण्यात येत आहे. राज्यात बाधित भागातून २१६ प्रवासी आले आहेत.

मुंबई बंदरावर काल दाखल झालेल्या फिलिपाइन्सच्या एमव्ही बौडिका या जहाजावरील (क्रूझ) एका फिलिपाइन नागरिकाला ताप, सर्दी, खोकला अशी लक्षणे आढळल्याने, त्याला या जहाजवरच वेगळे ठेवण्यात आले. त्याचा प्रयोगशाळा नमुना कस्तुरबा मध्यवर्ती प्रयोगशाळेस पाठविण्यात आला आहे. या जहाजावर कुणीही भारतीय नसून कुणाला कसलीही लक्षणे नाहीत. हे जहाज आज पोरबंदरला पोहोचले. कोरोना विषाणू आजार प्रतिबंध व नियंत्रण पूर्वतयारी म्हणून राज्यात सर्व जिल्हा रुग्णालये, तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये विलगीकरण कक्ष स्थापन करण्यात आले आहेत. ३९ विलगीकरण कक्षांमध्ये ३६१ बेड्स उपलब्ध आहेत. बाधित भागातून राज्यात आलेल्या एकूण २१६ प्रवाशांपैकी १३७ प्रवाशांचा १४ दिवसांचा पाठपुरावा पूर्ण झाला आहे. 

टॅग्स :कोरोना