Join us  

‘आजोबा’सारखीच कॉलर आणखी पाच बिबट्यांना लागणार

By ऑनलाइन लोकमत | Published: August 02, 2020 6:37 AM

संजय गांधी राष्ट्रीय उद्यान परिसरावर नजर । वन विभाग, वाइल्डलाइफ कंझर्व्हेशन सोसायटीचा अभ्यास

मुंबई : यापूर्वी एका बिबट्याला ‘आजोबा’ नावाची कॉलर चीप लावण्यात आली होती; तशीच मुंबई आणि आसपासच्या परिसरातील बिबट्यांचा अभ्यास करण्यासाठी पाच बिबट्यांना चीप लावण्यात येणार आहे. त्यासाठी खास जीपीएस कॉलर तयार करण्यात आली आहे. कॉलर खरेदीसाठी शासन मान्यतेने निधी प्राप्त करून घेऊन हा प्रकल्प जानेवारी २०२१ पर्यंत सुरू करण्याचे विचाराधीन आहे. ३ मादी आणि २ नर बिबट्यांना कॉलर लावण्याचा प्रयत्न करण्यात येणार असून त्यासाठी त्यांचे वय, लिंग, आरोग्य स्थिती विचारात घेतली जाईल.

मुंबईतील बिबटे उत्तरेकडील मोठा रस्ता ओलांडून तुंगारेश्वर वन्यजीव अभयारण्यात कसे जातात? बोरीवली संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील बिबटे तेथील जागा आणि वेळेचा वापर कशा प्रकारे करतात? अशा अनेक गोष्टींच्या अभ्यासासह मुंबई आणि आसपासच्या क्षेत्रातील बिबट्यांचा वावर आणि संघर्ष निवारणासंबंधी व्यवस्थापकीय शिफारशी सुचविल्या जाणार आहेत. प्रत्यक्षात या शिफारशी सुचविण्यासाठीच हा अभ्यास हाती घेण्यात येणार आहे.मानव व बिबट्या सहसंबंध समजून घेण्यासाठी बिबट्याच्या ‘टेलिमेट्री’ अभ्यासाला केंद्राच्या पर्यावरण, वन व हवामान बदल मंत्रालयाने मान्यता दिली आहे. त्यानुसार, राज्याचा वन विभाग व वाइल्डलाइफ कंझर्व्हेशन सोसायटी-इंडिया संयुक्तपणे हा अभ्यास करेल. पुढील दोन वर्षांत त्याचे निष्कर्ष हाती येतील. संजय गांधी राष्ट्रीय उद्यान व आजूबाजूचा परिसर या अनुषंगाने होणाऱ्या अभ्यास प्रकल्पावर वन विभागामार्फत अप्पर प्रधान वनसंरक्षक सुनील लिमये व वाइल्डलाइफ कंझर्व्हेशन सोसायटी-इंडियामार्फत डॉ. विद्या अत्रेय या मार्गदर्शन करीत कामकाज पाहतील. त्यांनी यापूर्वी मानव - बिबट्यांचा संबंध व संघर्षाबाबत अनेक प्रकारचे संशोधन केले आहे.कोण आहे ‘आजोबा’? : डॉ. विद्या अत्रेय या वन्यजीव अभ्यासिकेने बिबट्याच्या अंगावर कॉलरप्रमाणे एक चीप बसवून जीपीएसच्या साहाय्याने त्याचा प्रवास टिपण्याचा प्रयत्न केला. त्या चीपवर नाव लिहिले ‘आजोबा’. माळशेजच्या घाटात आजोबाला सोडण्यात आले. मात्र सह्याद्रीच्या रांगा ओलांडत आजोबा मुंबईच्या दिशेने निघाला. माळशेज घाट ते मुंबईतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यान हे १२० किलोमीटरचे अंतर आजोबाने जवळपास साडेतीन आठवड्यांत चालत पार केले. तो कुठल्या दिवशी कुठे गेला, हे त्याला बसविलेल्या चीपमुळे अगदी अचूक नोंद होत गेले.

टॅग्स :बिबट्यामुंबई