Join us  

आणखी पाच महाविद्यालये झाली स्वायत्त, मुंबईतील तीन, तर नागपूरमधील दोन

By ऑनलाइन लोकमत | Published: February 19, 2019 6:20 AM

एकूण संख्या ७३ : मुंबईतील तीन, तर नागपूरमधील दोन महाविद्यालयांचा समावेश

मुंबई : जानेवारी २०१९ मध्ये यूजीसीने राज्यातील आठ महाविद्यालयांना स्वायत्ततेचा दर्जा बहाल केल्याचे घोषित केले होते. त्यानंतर आता राज्यातील आणखी पाच महाविद्यालयांना स्वायत्ततेचा दर्जा दिला आहे. यामुळे राज्यातील स्वायत्त महाविद्यालयांची संख्या ७३ वर पोहोचली आहे. नवीन स्वायत्तता घोषित केलेल्या महाविद्यालयांमध्ये तीन महाविद्यालये ही मुंबईतील असून इतर दोन नागपूर आणि अमळनेर येथील आहेत. मुंबईतील या तीन महाविद्यालयांमुळे मुंबईतील स्वायत्त महाविद्यालयांची संख्या २३ वर पोहोचली आहे.

पाच वर्षांपूर्वी राज्यात स्वायत्तता मिळालेल्या महाविद्यालयांची संख्या फक्त ३६ होती. आता ती ७३ वर आली आहे. सप्टेंबर महिन्यात स्वायत्ततेसाठी झालेल्या परिषदेत हा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर आता ही प्रक्रिया पूर्ण झाली आहे. स्वायत्तता मिळाल्यास महाविद्यालय व्यवस्थापनाला काम करण्याची मोकळीक मिळेल, हे लक्षात घेऊनच महाविद्यालयांना स्वायत्त दर्जा देण्यात आला आहे .स्वायत्त संस्था, महाविद्यालयांना नवे विषय सुरू करण्याचे, इतरत्र शाखा उघडण्याचे, प्राध्यापकांना प्रोत्साहनपर सुविधा देण्याचे, शैक्षणिक करार करण्याचे, कौशल्य विकासाचे अभ्यासक्रम तयार करण्याचे स्वातंत्र्य आहे. शिवाय महाविद्यालयांचा अभ्यासक्रम उद्योगक्षेत्राला लिंक करता येणार आहे.स्वायत्तता मिळालेली महाविद्यालयेपोदार महाविद्यालय - मुंबई, प्रताप महाविद्यालय - अमळनेर, निर्मला निकेतन सोशल वर्क महाविद्यालय - मुंबई, एम. एम. शाह महाविद्यालय - मुंबई, तिरपुडे महाविद्यालय - नागपूर.स्वायत्ततेचा दर्जा मिळणे म्हणजे काय?स्वायत्त महाविद्यालयांना त्यांचा अभ्यासक्रम व शिक्षणक्रम ठरविण्याचे स्वातंत्र्य दिले जाते. या महाविद्यालयांना नवीन परीक्षापद्धती आणि त्याची नवीन कार्यपद्धती राबविण्याचेही स्वातंत्र्य मिळते. या महाविद्यालयांना कार्यक्षेत्राबाहेर नवीन संशोधन, अभ्यास केंद्र, परदेशी विद्यार्थ्यांना प्रवेश, तज्ज्ञ शिक्षकांची नियुक्ती असे अनेक बदल करता येतात.

टॅग्स :मुंबईविद्यापीठमहाविद्यालय