Join us  

पाच महिन्यांनंतरही मदतीसाठी वंजारे कुटुंबीयांची फरपट सुरूच

By ऑनलाइन लोकमत | Published: December 07, 2018 4:12 AM

जुलै महिन्यातील पावसाळ्यात बेस्ट चालकाच्या चुकीमुळे झालेल्या अपघातात जखमी झालेल्या ऐश्वर्या वंजारे (१७) हिला अद्याप बेस्ट प्रशासनाकडून कुठलीही मदत मिळाली नाही.

मुंबई : जुलै महिन्यातील पावसाळ्यात बेस्ट चालकाच्या चुकीमुळे झालेल्या अपघातात जखमी झालेल्या ऐश्वर्या वंजारे (१७) हिला अद्याप बेस्ट प्रशासनाकडून कुठलीही मदत मिळाली नाही. वंजारे कुटुंबीयांनी वारंवार बेस्ट प्रशासनाच्या पायऱ्या झिजवूनही या कुटुंबीयांना कोणतीही मदत मिळाली नाही. त्यामुळे नानावटी रुग्णालयात घेतलेल्या उपचारांचा तब्बल नऊ लाखांच्या बिलाचा आर्थिक भार सोसणे कठीण झाले आहे. परिणामी, अपघातानंतर ‘स्पेशल केस’ म्हणून हे प्रकरण हाताळण्याचे आश्वासन दिलेल्या बेस्ट प्रशासनाने मात्र पाच महिने उलटूनही केवळ आश्वासने दिली आहेत.सांताक्रुझ येथील रहिवासी असलेली ऐश्वर्या वंजारे ३ जुलै रोजी कॉलेजमधून घरी जात असताना पावसाच्या पाण्यातून वाट काढत असताना बेस्ट चालकाने धडक दिली. या अपघातात तिच्या पायाला गंभीर दुखापत झाली. शिवाय शरीरावरही अन्य गंभीर जखमाही झाल्या आहेत. या वेळी अपघातानंतर बेस्ट चालक निघून गेला. मात्र तेथेच मदतीसाठी विव्हळत असलेल्या ऐश्वर्याला त्वरित मदत मिळाली नाही. अपघाताच्या काही वेळानंतर रस्त्यावरील काही लोकांनी तिला जवळच्या पालिका रुग्णालयात दाखल केले. मात्र तेथे आवश्यक सेवा-सुविधा नसल्याने नानावटी रुग्णालयात हलविण्यात आले. नानावटी रुग्णालयातून २५ आॅगस्ट रोजी ऐश्वर्याला डिस्चार्ज देण्यात आला. ऐश्वर्याच्या आई-वडिलांचे लहानपणी निधन झाल्यामुळे तिची आजी शकुंतला वंजारे आणि काका प्रकाश वंजारे तिचा सांभाळ करतात. ऐश्वर्याचे काका प्रकाश वंजारे हे रिक्षाचालक आहेत. सध्या ऐश्वर्याची प्रकृती सुधारत असून तिने पुन्हा महाविद्यालयात जाणे सुरू केले आहे, मात्र अजूनही वंजारे कुटुंबीयांवरील हा आर्थिक भार कमी झालेला नाही. याविषयी ऐश्वर्याचे काका प्रकाश वंजारे यांनी सांगितले की, बेस्ट प्रशासनाकडे मदतीसाठी वारंवार जाऊनही पदरी निराशा आली.प्रशासनाकडून अपघाताविषयी खटला दाखल करण्याचे सूचित केले आहे, त्यानंतर खटल्याच्या प्रक्रियेनंतर अवघ्या ४० हजार रुपयांची मदत मिळेल, असे सांगण्यात आले आहे. कागदपत्रे जोडावी लागतील, असे म्हणत केवळ बेस्ट प्रशासनाकडे येरझाºया सुरू आहेत, मात्र कोणतेही कृतिशील पाऊल उचलले जात नाही.न्यायालयीन सुनावणीनंतर मदत दिली जाणारवंजारे यांच्या केसची न्यायालयीन सुनावणी होईल. ही न्यायालयीन प्रक्रिया संपल्यानंतर निकालाअंती मदत करण्यात येणार आहे.- आशिष चेंबूरकर,बेस्ट समिती अध्यक्ष