Join us

फरार शाखाप्रमुखाने दिली हत्येसाठी पाच लाखांची सुपारी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2019 06:23 IST

अटक साथीदाराने केला खुलासा

- गौरी टेंबकर - कलगुटकर 

मुंबई : नागरिकत्वाबाबत चौकशी सुरू असलेल्या शिवसेनेच्या फरार शाखाप्रमुखाने, एकाच्या हत्येसाठी पाच लाखांची सुपारी दिल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे. त्याच्या साथीदाराला अटक केल्यानंतर हा प्रकार उघड झाल्याचे आसाम पोलिसांनी ‘लोकमत’ला सांगितले. वॉर्ड क्रमांक ३३च्या शिवसैनिकांमध्ये या बातमीने अजूनच खळबळ उडाली आहे. आता तरी याबाबत शिवसेना काय निर्णय घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

शिवसेनेच्या वॉर्ड क्रमांक ३३चा सध्या फरार झालेला शाखाप्रमुख अमीरुद्दीन तालुकदार (३६) हा सापडल्यास त्याला त्वरित आमच्या स्वाधीन करा, अशी विनंती आसाम पोलिसांनी मालवणी पोलिसांना केली आहे. त्याच्या एका साथीदाराला त्यांनी नुकतीच अटक केली असूनही, त्याच्या चौकशीमध्ये ‘तालुकदारने मला संबंधित व्यक्तीची हत्या करण्यासाठी ५ लाख रुपयांची सुपारी दिली होती,’ असे कबूल केल्याचे आसाम पोलिसांकडून सांगण्यात आले. तालुकदारचा शोध घेण्यासाठी आसामच्या मुराझर येथील पोलिसांचे एक पथक मालवणी पोलिसांची मदत मागण्यासाठी मुंबईत आले होते.

या पथकाचे प्रमुख आणि तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक गिरीश बोरा यांनी ‘लोकमत’ला दिलेल्या माहितीनुसार, तालुकदारने एका व्यक्तीची हत्या करण्यासाठी त्याच्या साथीदाराला ५ लाख रुपयांची सुपारी दिली होती. त्या साथीदाराला आम्ही आसाममधून अटक केल्यानंतर त्यानेच ही बाब उघड केली. मात्र, तालुकदारने त्याला पैसे दिलेच नाहीत. त्यानुसार, बोरा यांच्या पथकाने त्याचा जबाब नोंदविला असून, या प्रकरणी तालुकदारच्या साथीदाराला साक्षीदार बनविणार आहोत. या प्रकरणी तालुकदारला आम्ही फरार घोषित केले आहे, असेही बोरा यांनी नमूद केले.

टॅग्स :शिवसेना