Join us

गणेशोत्सव काळात शाळांना पाच दिवस सुटी

By admin | Updated: September 11, 2015 01:45 IST

गणेशोत्सवामध्ये गौरी विसर्जनापर्यंत पाच दिवस शहरातील पालिका व सर्व खाजगी शाळांना सुटी देण्याचा निर्णय महापालिका शिक्षण मंडळाने घेतला आहे. शाळा व्यवस्थापनास

नवी मुंबई : गणेशोत्सवामध्ये गौरी विसर्जनापर्यंत पाच दिवस शहरातील पालिका व सर्व खाजगी शाळांना सुटी देण्याचा निर्णय महापालिका शिक्षण मंडळाने घेतला आहे. शाळा व्यवस्थापनास याविषयी पत्र पाठविण्यात आले असून या दरम्यान परीक्षांचे आयोजन न करण्याच्याही सूचना दिल्या आहेत. नवी मुुंबईमध्ये नोकरी व्यवसायासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून नागरिक वास्तव्यासाठी आले आहेत. कोकण व पश्चिम महाराष्ट्रातील हजारो नागरिक गणेशोत्सवासाठी गावी जात असतात. परंतु अनेक खाजगी विशेषत: इंग्रजी माध्यमाच्या शाळा गणेशोत्सव काळात शाळांना सुटी देत नाहीत. याशिवाय याच दरम्यान परीक्षांचेही आयोजन करण्यात येत असल्याचे निदर्शनास आले होते. मुंबई, नवी मुंबई परिसरात गौरी विसर्जनापर्यंत पाच दिवस सर्व शाळांना सुटी देण्याचे आदेश शासनाने दिल्यानंतरही त्याची अंमलबजावणी काही शाळा करत नव्हत्या. यामुळे मागील काही वर्षांपासून मनसे व इतर पक्षांनी उत्सवाच्या अगोदरच सुट्यांसाठी पाठपुरावा सुरू केला होता. महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे शहर अध्यक्ष सविनय म्हात्रे यांनी महापालिका आयुक्त व शिक्षण मंडळाला पत्र देवून १७ ते २१ सप्टेंबर दरम्यान सुटी जाहीर करण्याचे आवाहन केले होते. शिवसेनेचे सीवूडमधील विभाग प्रमुख सुमित्र कडू यांनी परिसरातील एका इंग्रजी माध्यमाच्या शाळेने उत्सव काळात परीक्षेचे आयोजन केल्याचे निदर्शनास येताच पालिकेकडे पत्रव्यवहार करून परीक्षा रद्द करण्याचे व सर्व शाळांना सुट्या देण्याची मागणी केली होती. अखेर पालिका शिक्षण मंडळाने गौरी विसर्जनापर्यंत शहरातील सर्व खाजगी अनुदानित व विनाअनुदानित शाळांना सुटी देण्याचे आदेश दिले आहेत. यामुळे सर्व गणेशभक्तांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे. (प्रतिनिधी)