आविष्कार देसाई, अलिबागरायगड जिल्ह्यासाठी आलेला १३५ कोटी निधीपैकी बहुतांश निधी वितरीत करण्यात जिल्हा नियोजन समितीला यश आले आहे. मात्र तरीही ४ कोटी ९९ लाखांचा खर्च करण्यात अपयश आल्याने तो निधी सरकारच्या तिजोरीत परत गेला आहे. निधी खर्च न करण्यात कोलाड लघु पाटबंधारे विभागाचा समावेश आहे. जिल्ह्याच्या विकासासाठी सरकारने १३५ कोटी रुपयांचा निधी दिला होता. पैकी एकूण निधीच्या एक टक्का निधी सरकारकडे जमा करायचा असतो. सरकारकडून मार्गदर्शक सूचना न आल्याने तो निधीही समर्पित करावा लागला आहे. त्यामुळे जिल्ह्याच्या वाट्याला आलेला १३४ कोटी रुपयांचा निधी वितरीत करण्यात आला. त्यातील ९५ टक्के निधी विविध विभागांनी खर्च केला असून कोलाड लघु पाटबंधारे विभागासाठी आलेला १ कोटी १४ लाखांचा निधी खर्च करण्यात आलेला नाही. ३१ मार्चची डेडलाईन संपल्यावर ही आकडेवारी उपलब्ध झाली आहे. काही विभागांना निधी खर्च करण्यासाठी बरीच धावपळ करावी लागली. महाड सार्वजनिक बांधकाम विभाग- ९१ लाख रुपये, अलिबाग सार्वजनिक बांधकाम विभाग- ६६ लाख रुपये, रायगड जिल्हा परिषद (ग्रामपंचायत- नागरी सुविधा)- ४२ लाख रुपये, महाड सार्वजनिक बांधकाम विभाग (आस्थापना)- २८ लाख रुपये, रायगड जिल्हा परिषद आरोग्य विभाग- २१ लाख रुपये, उपजिल्हा रुग्णालय बांधकाम विभाग- २८ लाख रुपये, वन विभाग (मृदु व जलसंधारण)- १३ लाख रुपये यासह अन्य विभागाने एकूण ४ कोटी ९९ लाख रुपये खर्च केले नाहीत.सरकारने विकासासाठी दिलेला निधी संबंधित विभागाच्या अकार्यक्षमतेबरोबरच योग्य नियोजन न केल्याने खर्च झालेला नाही, म्हणून तो सर्व निधी सरकारच्या तिजोरीत जमा झाला आहे.
पाच कोटी निधी परत
By admin | Updated: April 1, 2015 22:24 IST