Join us

देवगडात मासेमारी ठप्प

By admin | Updated: September 11, 2014 23:10 IST

मासळी महागली : वादळवाऱ्यांमुळे नौका किनाऱ्यावर, मच्छिमार संकटात

नरेंद्र बोडस - देवगड समुद्रकिनारी सध्या मच्छिमारी व्यवसाय ठप्प पडला आहे. गेले दोन ते तीन दिवस वादळी वारे व अतिवृष्टीच्या इशाऱ्यांमुळे मच्छिमारांनी आपल्या नौका किनाऱ्यावर ठेवणेच पसंत केले आहे. त्यामुळे शेकडो नौका किनाऱ्यावर नांगरून ठेवलेल्या दिसत आहेत. त्यातच उतरणीच्या दक्षिणेकडील प्रवाहामुळे मच्छिमारांना मासळी मिळणेच बंद झाले आहे. याचा परिणाम म्हणून मासळीही महाग झाली आहे.देवगड समुद्रकिनारी येथील सुमारे ३५० ते ४०० यांत्रिकी नौकाधारक, सुमारे १५० ते २०० पाती नौकाधारक व किनारी मच्छिमारी करणारे मच्छिमार किनाऱ्यावर अडकून पडले आहेत. वादळी वारे व अतिवृष्टीच्या इशाऱ्यामुळे नौकाधारक सावध पवित्रा घेत आहेत. या सर्व नौका किनाऱ्यावर नांगरून ठेवलेल्या असल्याने देवगड बंदरात नौकांची गर्दी झालेली आहे. सध्या उतरणीचे वारे व प्रवाह दक्षिण दिशेला जोर धरत असल्याने नौका भर समुद्रात गेल्या व जाळे टाकले की प्रवाहाची ओढ बसून जाळे गरगर फिरताना दिसू लागते. त्यामुळे मच्छिमारांना मासळी पकडण्यामध्ये मोठी अडचण येत असून मासळी जाळ्यात टिकत नाही. त्यामुळे मत्स्य दुष्काळ जाणवत आहे.त्यातच जोरदार प्रवाहामुळे मासळीसुद्धा एका जागी स्थिर रहात नाही. अशा परिस्थितीत समुद्रात जावून परत येण्याइतके डिझेलही सुटत नाही व मोठ्या नुकसानीला तोंड द्यावे लागत असल्याची बहुतांश मच्छिमारांची तक्रार आहे.आगामी दोन ते तीन दिवसानंतर वातावरण निवळल्यास मच्छिमारी हंगाम पुन्हा पूर्वस्थितीवर येईल व महालय काळाच्या अंतिम टप्प्यात पुन्हा मासळीची चव चाखायला मिळेल या आशेवर मच्छिमार व मच्छि खवय्ये आहेत.देवगड समुद्रकिनारी तुटपुंज्या मच्छिमारीमध्ये अगदी निम्न स्तरावरची मासळी मिळत असून त्याचीही किंमत किलोमागे शेकड्यांमध्ये मोजावी लागत आहे. चिंगुळ, पापलेट व हलवा दृष्टीसही पडत नाही अशी स्थिती असून बांगडा व सुरमई हे चविष्ट मासे दुर्मिळच झाले आहेत. सध्या महालयाचा काळ असल्यामुळे मच्छिमारांना मासळीचा दुष्काळ असह्य होत आहे व मच्छि खवय्येसुद्धा अत्यंत नाराज आहेत.किनाऱ्यालगत मच्छिमारी करणारे पारंपरिक मच्छिमारही सध्या बिचकून आहेत. कारण प्रवाहाचा अंदाज न आल्याने गणेशोत्सवादरम्यान मच्छिमार समुद्रात ओढले गेले होते.मच्छिमार समुद्रात जावून बुडाल्याच्या घटना मिठमुंबरी, फणसे, मिठबांव समुद्रात घडल्या आहेत.त्याचीही दखल घेऊन किनाऱ्यावरील मच्छिमारी अत्यंत रोडावली आहे.