Join us
Daily Top 2Weekly Top 5

राज्याच्या सागरी क्षेत्रात १ जून ते ३१ जुलै या कालावधीत मासेमारीस बंदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2021 04:06 IST

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मासळी साठ्यांचे जतन होण्यासाठी, तसेच पावसाळ्यात मच्छिमारांचे संरक्षण व्हावे, यासाठी १ जून ते ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : मासळी साठ्यांचे जतन होण्यासाठी, तसेच पावसाळ्यात मच्छिमारांचे संरक्षण व्हावे, यासाठी १ जून ते ३१ जुलै २०२१ या कालावधीत राज्याच्या जलधी क्षेत्रात यांत्रिक मासेमारी नौकांना पावसाळी मासेमारीसाठी बंदी घालण्यात आली असल्याचा आदेश मत्स्य व्यवसाय विभागाने काढला आहे. राज्याचे मत्स्य व्यवसाय मंत्री अस्लम शेख यांनी ही माहिती दिली.

जून व जुलै महिन्यात मासळीच्या जिवांना प्रजोत्पादनासाठी पोषक वातावरण असते. या कालावधीत मासेमारीस बंदी घातल्यामुळे मासळीच्या बीजनिर्मिती प्रक्रियेस वाव मिळून मासळीच्या साठ्यांचे जतन होते, तसेच या कालावधीत वादळी हवामानामुळे मच्छिमारांची जीवित व वित्तहानी होऊ नये यासाठी ही बंदी घालण्यात आली आहे, असे त्यांनी सांगितले.

यासंबंधी मत्स्य व्यवसाय विभागाने काढलेल्या आदेशात नुसार, १ जून २०२१ ते ३१ जुलै २०२१ या कालावधीत राज्याच्या सागरी किनाऱ्यापासून १२ सागरी मैलापर्यंत यांत्रिक मासेमारी नौकास पावसाळी मासेमारी बंदी लागू करण्यात आली आहे. मात्र, मासेमारी बंदी ही पारंपरिक पद्धतीने मासेमारी करणाऱ्या बिगर यांत्रिकी नौकांना लागू राहणार नाही. राज्याच्या सागरी जलधी क्षेत्रात (सागरी किनाऱ्यापासून १२ सागरी मैलापर्यंत) यांत्रिक मासेमारी नौकांस पावसाळी मासेमारी बंदी कालावधीत मासेमारी करताना आढळल्यास/केल्यास महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियम, १९८१ कलम १४ अन्वये असे गलबत जप्त करण्यात येऊन त्यात पकडलेली मासळी जप्त करण्यात येईल तसेच कलम १७ मधील तरतुदीअन्वये जास्तीत जास्त कठोर कारवाई करण्यात येईल, असे या आदेशात नमूद केले आहे.

----------------------------------------