Join us
Daily Top 2Weekly Top 5

मासेमारी नौका दिघी बंदराच्या आश्रयाला

By admin | Updated: September 12, 2014 01:46 IST

मुसळधार पाऊस व वादळी वाऱ्यामुळे मासेमारीसाठी मुंबईसह कोकणातील गेलेल्या मोठ्या मासेमारी नौका (ट्रॉलर्स) मासेमारी अर्धवट टाकून सुरक्षितेसाठी मुरुड तालुक्यातील आगरदांडा व श्रीवर्धन बंदराच्या आश्रयाला

बोर्ली-मांडला : मुसळधार पाऊस व वादळी वाऱ्यामुळे मासेमारीसाठी मुंबईसह कोकणातील गेलेल्या मोठ्या मासेमारी नौका (ट्रॉलर्स) मासेमारी अर्धवट टाकून सुरक्षितेसाठी मुरुड तालुक्यातील आगरदांडा व श्रीवर्धन तालुक्यातील दिघी बंदराच्या आश्रयाला आल्या आहेत.दक्षिणेकडून उत्तरेकडे वाहणारे हेटशी वारे वादळाची सूचना देतात. हेटशी वारे व उत्तरेकडून समुद्राकडे झेपवणारे उपरती वाऱ्याचा जाता येता संयोग झाल्यामुळे समुद्र पुन्हा खवळला अन् वादळ सुरु झाले. परिणामी भाऊचा धक्का (मुंबई), रत्नागिरी, अलिबाग, करंजा, मोरा उरण, रेवस, हर्णे, श्रीवर्धन, गुहागर आदी भागातून मोठे ट्रॉलर्स पर्ससीन मासेमारी, कोळंबी मासेमारी, माखूल मासेमारीसाठी ४० वाव खोल समुद्रात गेल्या होत्या व त्या ठिकाणी चार - पाच दिवसांपासून मासेमारी करीत होत्या. ज्या ठिकाणी मासेमारी चालते तेथून किनारा न दिसता अथांग समुद्र दिसतो. १५ आॅगस्टनंतर शासकीय नियमाप्रमाणे मासेमारी सुरु झाल्यानंतर अनंत अडचणींना तोंड देत मच्छीमारांनी आपल्या नौका समुद्रात दाखल करुन मासेमारी करण्यासाठी खोल समुद्रात रवाना केल्या होत्या.हेटशी वारे व उपरती वाऱ्याने समुद्रात वादळ निर्माण झाल्याने प्रचंड आर्थिक नुकसान व जीवाला धोका या दुहेरी संकटात मच्छीमार सापडले आहेत. समुद्र म्हणजे नदी नाही. सर्व नद्यांचे पाणी शेवटी समुद्रालाच मिळते.समुद्राच्या लाटांत अफाट शक्ती असते. छोटी लाट व वादळी पावसाने फुटणारी लाट या दोघांमध्ये दर चौरस मीटरला १० ते १०००० टन वजनाचा दणका देण्याची ताकद असते.पर्यावरणाचा समतोल ढासळत चालल्याने समुद्राने देखील नियम बदलले. परिणामी अशी वादळे केव्हाही होण्याचा धोका आहे. वादळाने दिघी बंदरात आलेला मच्छीमारांमध्ये घबराट पसरली आहे. अशातच हवामान खात्याने मुसळधार पावसाची शक्यता वर्तविल्याने परिस्थितीचे गांभीर्य वाढले आहे. हे वादळ वेळीच शमले तर ठीक अन्यथा नौका मालकांसहित मच्छीमारांची उपासमारदेखील होवू शकते. मोठ्या मच्छीमारी नौका मासळी पकडून मासळी बाजारासाठी मुंबईच्या मार्केटमध्ये नेतात. मासेमारी ठप्प झाल्याने मुंबईत मासळीचा तुडवडा मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता आहे.