Join us
Daily Top 2Weekly Top 5

"मच्छिमारांच्या डिझेल तेलावरील वाढीव दराचा प्रश्न केंद्रीय अर्थमंत्र्यांशी चर्चा करून लवकर सोडवणार"

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2022 17:10 IST

केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांचे आश्वासन

मुंबई - राज्यातील मच्छिमारांना डिझेल तेलावरील वाढीव दराचा प्रश्न केंद्रीय अर्थमंत्र्यांशी चर्चा करून लवकर सोडवणार असे ठोस आश्वासन केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी काल उत्तर मुंबईचे भाजप खासदार गोपाळ शेट्टी व कोळी महासंघाचे अध्यक्ष, आमदार रमेश पाटील यांच्या शिष्टमंडळाला दिले. मंत्री हरदीप सिंग पुरी यांच्या निर्माण भवन, नवी दिल्ली कार्यालयात काल उत्तर मुंबईचे खासदार  शेट्टी व  आमदार  रमेश पाटील यांच्या नेतृत्वाखालील  शिष्टमंडळाने भेट घेतली.

यावेळी महाराष्ट्र मच्छिमार कृती समिती सरचिटणीस किरण कोळी, भाजपा मच्छिमार सेलचे प्रदेशाध्यक्ष चेतन पाटील या मच्छिमारांच्या शिष्टमंडळानी देशातील मच्छिमारांना वाढीव दराने पेट्रोलियम पदार्थ मिळत असल्याबाबत भेट घेतली. लोकमतने सुरवाती पासून सातत्याने हा प्रश्न मांडला असून राज्य व केंद्र सरकारचे लक्ष वेधले आहे. खासदार गोपाळ शेट्टी व महाराष्ट्र मच्छिमार कृती समितीच्या शिष्टमंडळाने यापूर्वी केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी व केंद्रीय मत्स्यव्यवसाय मंत्री  पुरुषोत्तम रुपाला यांची भेट घेऊन सदर प्रश्न त्यांच्या कडे मांडला होता. तर या प्रश्नी वेसावकरांनी दि,24 मार्च रोजी अंधेरीच्या तहशील कार्यालयावर धडक मोर्चा काढला होता.

उपस्थिती अधिकाऱ्यांनी गुजरात व महाराष्ट्रात डिझेल तेलावरील मूल्यवर्धित कर परत मिळत असल्यामुळे फक्त एक दोन रूपयांचा फरक राहीला आहे. व इतर सागरी राज्यांचा प्रश्न नाही. अशी चुकीची माहीती देऊन केंद्रीय मंत्र्यांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. परंतू आमदार  रमेश पाटील व किरण कोळी यांनी अक्षेप घेत सांगितले की, मूल्यवर्धित कर परतावा हा राज्यांचा विषय आहे. आम्ही किरकोळ व घाऊक विक्रेत्या यामध्ये प्रति लिटर रू. २५ ते ३० रूपये फरक आहे. तो कमी करणेबाबत आलो आहोत. याबाबत दि, २८ मार्च रोजी शिष्टमंडळ आले होते. व आपण मच्छिमारांना विशेष दर्जा निर्माण करून सवलत द्यावी. अशी विनंती केली. परंतू अधिकाऱ्यांच्या नकारात्मक भूमिकेमुळे आमदार  पाटील यांनी आक्रमक भूमिका घेत  सन २०१३ मधील केंद्र सरकारने सवलत दिली होती. ती सवलत आपले सरकार का देऊ शकत नाही. मच्छिमारांमुळे सरकारवर फार मोठा अर्थिक बोजा पडणार नाही सांगितले.. 

केंद्रीय  मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी केंद्रीय अर्थमंत्र्यांच्या कार्यालयात प्रस्ताव दिला आहे. लवकरच मच्छिमारांना पेट्रोलियम पदार्थावरील वाढीव दराबाबत त्यांच्याशी चर्चा करून लवकरच निर्णय घेतो असे आश्वासन दिले. तत्पूर्वी केंद्रीय मत्यव्यवसाय मंत्री पुरुषोत्तम रुपाला यांची त्यांच्या  दिल्लीच्या निवासस्थानी भेट घेतली. त्यांनी सदर प्रश्न पंतप्रधानांकडे नेला असून उद्या त्यांना भेटणार आहे असे सांगितले.