Join us

भारत-पाकिस्तान वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर समुद्रात मच्छिमारांनी दक्षता घेण्याच्या सूचना

By मनोहर कुंभेजकर | Updated: May 10, 2025 23:23 IST

मासेमारी करताना काही नुकसान झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी स्वतः मच्छिमार नौकाधारक यांची राहील

मनोहर कुंभेजकर, मुंबई: सध्याच्या भारत पाकिस्तानमधील युद्धाच्या पार्श्वभूमीवर समुद्रात मासेमारीसाठी बोटी घेऊन जाताना मच्छिमारांनी दक्षता घेण्याच्या सूचना मत्स्यव्यवसाय आयुक्त किशोर तावडे यांनी परिपत्रक काढून मच्छिमार सहकारी सोसायटी, नौकामालक यांना दिल्या आहेत. भारतीय नौसेनेकडून समुद्रात ओडीए (ऑफशोअर डिफेन्स एरिया) वरील नमूद प्रतिबंधित क्षेत्रात मच्छिमारांना मासेमारी करता येणार नाही. ऑईल-रिग सारख्या क्षेत्रात मासेमारीला जाऊ नये अथवा वादळा पासून वाचण्याकरिता त्या प्रतिबंधीत क्षेत्राचा आश्रय घेऊ नये, तसेच तेथे मासेमारी नौका बांधू नये, याबाबत आपल्या कार्यक्षेत्रातील सर्व मच्छिमार सोसायटी/संघ/मच्छिमार समुदायांना कळविण्यात यावे.

सदर ठिकाणी मासेमारी करताना काही नुकसान झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी स्वतः मच्छिमार नौकाधारक यांची राहील. त्यामुळे दिलेल्या प्रतिबंधित क्षेत्रातील समन्वय ठिकाणी कोणत्याही परिस्थितीत जावू नये याची दक्षता घ्यावी. मच्छिमारांच्या बोटी मासेमारी करीत असताना पाकिस्तान मेरिटाईम सिक्युरिटी एजन्सीमार्फत यापूर्वी पकडलेल्या नौका पाकिस्तानी यंत्रणांनी ताब्यात घेतलेल्या आहेत. या बोटींचा वापर २६/११/२००८ च्या हल्ल्याप्रमाणे आपल्या देशाच्या किनारपट्टीवरील शहरांत घातपात करण्यासाठी होऊ शकतो असा अंदाज गुप्तचर यंत्रणेने वर्तवला आहे. अशा बोटी समुद्रात आढळल्यास तातडीने मत्स्यव्यवसाय विभाग, सुरक्षा यंत्रणा, स्थानिक पोलिस यंत्रणा, मच्छिमार सहकारी संस्था अथवा वायरलेस वरून कुटुंबीयांना माहिती द्यावी, जेणेकरून सुरक्षा यंत्रणांना तातडीने हालचाली करण्यात सहकार्य होईल.

मच्छिमार बांधव हे सागरी सुरक्षेबाबत डोळे व कान असल्याने सागरी सुरक्षेची जबाबदारी म्हणून मच्छीमार बांधव व नौका मालक यांनी सदर परिस्थितीत मत्स्यव्यवसाय विभागातील परवाना अधिकारी यांना सहकार्य करावे. तसेच सागरी सुरक्षेची जबाबदारी मच्छिमार बांधव व नौकाधारक यांच्यावर सुद्धा असल्याने या परिस्थितीत सुरक्षा यंत्रणांना आणि प्रशासनाला सहकार्य करावे, अशी विनंती मत्स्यव्यवसाय आयुक्तांनी केल्याची माहिती अखिल महाराष्ट्र मच्छिमार कृती समितीचे अध्यक्ष देवेंद्र तांडेल यांनी दिली.

टॅग्स :मुंबई