Join us

दूषित पाण्यामुळे कुंडलिकात मासे मृत

By admin | Updated: October 7, 2014 22:54 IST

या संधीचा फायदा घेत रोहा एमआयडीसीमधील कुठल्यातरी रासायनिक कारखान्याने प्रक्रिया न करताच दूषित सांडपाणी सोडल्याने कुंडलिका नदीत मासे मृत्युमुखी पडले आहेत.

रोहा : लोकप्रतिनिधींसह तहसील व पोलीस प्रशासन निवडणुकीच्या कामात व्यस्त आहेत. या संधीचा फायदा घेत रोहा एमआयडीसीमधील कुठल्यातरी रासायनिक कारखान्याने प्रक्रिया न करताच दूषित सांडपाणी सोडल्याने कुंडलिका नदीत मासे मृत्युमुखी पडले आहेत. याबाबत वारंवार आवाज उठवूनही कोणतीही कार्यवाही होत नसल्याची खंत खारगाव येथील कोळी बांधव नारायण कारभारी यांनी व्यक्त केली आहे. दूषित पाण्यामुळे मृत्युमुखी पडलेल्या माशांची व रासायनिक सांडपाण्याची दुर्गंधी खारगांव, आरे बुद्रुक, कुमोशी या परिसरात पसरली आहे. लहान मच्छिमार होड्यांमधून मासेमारी करुन उदरनिर्वाह करत असत, परंतु मासे मेल्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. शुक्रवार ते रविवार असलेल्या सलग सुट्ट्यांचा फायदा घेत सांडपाणी सोडण्यात आल्याचा आरोप नारायण कारभारी यांनी केला आहे. रोहा इंडस्ट्रीज असोसिएशनचे मालक सप्रे यांच्याशी संपर्क साधला असता असा प्रकार होणार नाही. जुनी वाहिनी फुटल्यामुळे काही प्रकार घडला असल्यास त्याची तातडीने दुरुस्ती करु, असे सांगितले. (वार्ताहर)