वसई : खोल समुद्रातील मासेमारीबंदी तसेच मोठ्या माशांचे चढे भाव अशा दोन कारणांमुळे खवय्यांची भिस्त आता सुक्या मच्छीवर आहे. आठवडा बाजारामध्ये सुकी मच्छी मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी आली आहे. दर पावसाळ्यात खवय्यांना सुकी मच्छीचाच आधार असतो. पावसाळ्यातील दीड महिने हा मासेमारी बंदीचा काळ असून या दिवसात मच्छीमार आपल्या बोटी समुद्रकिनारी शाकारून ठेवतात. त्यामुळे मच्छीबाजारात पापलेट, हलवा, कोलंबी, सुरमई, मांदेली व मुशी हे मासे पहावयास मिळत नाहीत. त्यामुळे खाडीतील मच्छी व सुकी मच्छी यावर नागरिकांचा भर असतो. खाडीतील निवटे, खेकडे, तिसर्या तर सुकी मच्छीमध्ये सोडे, खारे, सुके बोंबील, करंदी यांचा समावेश असतो. सोडे हे ६०० रू. किलो दराने विकले जात आहेत. पुर्वी करंदीचा वाटा २० ते ३० रू. ला मिळत असे तो यंदा ५० रू. वर गेला आहे. खाडीतील खेकडे २०० ते २५० रू. डझन (लहान) तर मोठे खेकडे ४०० ते ५०० रू. दराने विकले जातात. सध्या बाजारात निवट्यांना भरपुर मागणी आहे. सुकी मच्छीही निरनिराळ्या गावामध्ये भरणार्या आठवडा बाजारात हमखास उपलब्ध असतात. खाडीतील मासे मात्र भागातील मच्छीबाजारात विकले जातात. मासेमारी बंदीचा काळ संपला की मोठ्या माशांची आवक सुरू होते. तोवर मात्र खवय्यांना खाडीतील मच्छी व सुक्या मच्छीवरच अवलंबून रहावे लागते. (प्रतिनिधी)
खवय्यांचा भर खाडीतील मासळीवर
By admin | Updated: May 27, 2014 01:22 IST