Join us  

राशी कांबळे ठरल्या पहिल्या विजेत्या तर 23 वर्षानंतर झालं गणेश खैरनार यांचे स्वप्न पूर्ण

By ऑनलाइन लोकमत | Published: June 03, 2019 3:17 AM

म्हाडाच्या २१७ घरांची लॉटरी जाहीर : ढोल-ताशांच्या गजरात लॉटरीला सुरुवात

मुंबई : म्हाडाच्या मुंबई मंडळातर्फे रविवारी २१७ सदनिकांची लॉटरी काढण्यात आली. ढोल-ताशांच्या गजरात लॉटरीला सुरुवात झाली आणि राशी कांबळे यांच्या नावाची घोषणा झाली. त्या पहिल्या विजेत्या ठरल्या. शेल टॉवर सहकारनगर चेंबूर येथील अल्प उत्पन्न गटासाठीच्या सदनिकेसाठी ही लॉटरी होती.

म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या २१७ घरांची लॉटरी वांद्रे, पूर्व येथील म्हाडाच्या मुख्यालयामध्ये काढण्यात आली. या लॉटरीमध्ये अल्प उत्पन्न गटाकरिता सहकारनगर, चेंबूर येथील १७० सदनिका आणि मध्यम उत्पन्न गटाकरिता ४७ सदनिकांची लॉटरी काढण्यात आली.रविवारी सकाळी सव्वा दहाच्या सुमारास म्हाडाचे अध्यक्ष उदय सामंत यांच्या हस्ते लॉटरीचा शुभारंभ करण्यात आला. या लॉटरीमध्ये तब्बल ६६,५०० अर्ज दाखल झाल्याने मोठी चुरस पाहायला मिळाली. मात्र, लॉटरीच्या ठिकाणी अर्जदारांची संख्या फारच कमी होती. बहुतांश अर्जदारांनी थेट प्रक्षेपणाद्वारे लॉटरी पाहण्यास पसंती दिली. अवघ्या २१७ घरांची लॉटरी असल्याने लॉटरीच्या ठिकाणी मात्र उत्साह दिसला नाही. म्हाडा मुख्यालयाच्या आवारात अर्जदारांना निकाल पाहण्यास मंडप उभारण्यात आला होता. त्यात संगणकीय सोडतीचे प्रक्षेपण करण्यासाठी भव्य पडदा, तसेच तीन एलईडी स्क्रीन्स लावण्यात आले होते.गणेश खैरनार यांचे तेवीस वर्षांपासूनचे स्वप्न पूर्ण!यंदाच्या लॉटरीत गेल्या तेवीस वर्षांपासून म्हाडाच्या लॉटरीमध्ये घरासाठी अर्ज करणाऱ्या गणेश खैरनार यांना रविवारी घर जाहीर झाले. मुंबईमध्ये नोकरी, मात्र हक्काचे घर नसल्याने नाशिक ते मुंबई आणि पुन्हा नाशिक असा अनेक प्रवास करणाºया पण काही वर्षांपूर्वी मुंबईत भाड्याच्या घरात राहणाºया गणेश खैरनार यांना रविवारी म्हाडाचे घर लागले आणि त्यांना गहिवरून आले. खैरनार यांना सहकारनगर चेंबूर येथील सर्वसामान्य गटात हे घर जाहीर झाले.

गेल्या तेवीस वर्षांपासून माझे स्वत:चे घर व्हावे, यासाठी मी म्हाडाच्या लॉटरीमध्ये अर्ज करत आहे. मात्र, घर लागले नाही, पण मी हरून न जाता, जोपर्यंत घर लागत नाही, तोपर्यंत अर्ज करायचा असे ठरविले होते. अखेर तो दिवस आला आणि माझे घराचे स्वप्न पूर्ण झाले, असे भावुक उद्गार खैरनार यांनी काढले. आता मी माझ्या कुटुंबीयांसोबत या घरामध्ये राहायला जाणार असल्याचेही ते यावेळी म्हणाले.खैरनार हे कुर्ल्याच्या नेहरूनगर येथे भाड्याच्या घरात गेल्या काही वर्षांपासून राहत आहेत. यापूर्वी त्यांना मुंबईमध्ये घर नसल्याने नाशिकवरून प्रवास करावा लागत होता. खैरनार हे म्हाडा कर्मचारी आहेत. मात्र, त्यांनी कर्मचारी गटामध्ये अर्ज न करता सर्वसामान्य गटामध्ये अर्ज केला होता. आता हक्काचे घर जाहीर झाल्याने मी माझ्या आई, वडील, मुले आणि बायको यांच्यासोबत नवीन घरामध्ये राहायला जाणार असून, माझा खडतर प्रवास आता संपला, असे ते म्हणाले, तसेच म्हाडाचे कर्मचारी प्रशांत गायकवाड यांनाही या लॉटरीमध्ये घर जाहीर झाले. ते यावेळी म्हणाले की, गेल्या पाच वर्षांपासून अर्ज करत आहे. मात्र, घर जाहीर न झाल्याने खूप वाईट वाटायचे, तरीही मी माझे प्रयत्न सुरू ठेवले, अशी प्रतिक्रिया गायकवाड यांनी यावेळी दिली.

लॉटरीत आसू आणि हासूम्हाडाच्या मुंबई मंडळाची २१७ घरांची लॉटरी रविवारी जाहीर झाली. या लॉटरीतील घरांचे काउंटडाऊन सुरू होते तसतशी अर्जदारांची धडधड सुरू होती. अर्जदारांनी ज्या गटामध्ये अर्ज केलेला त्या गटातील लॉटरीच्या वेळी त्यांची उत्कंठा शिगेला पोहोचत होती. ज्यांना लॉटरी जाहीर झाली त्यांचा आनंद गगनात मावत नव्हता, तर ज्यांना लॉटरी लागली नाही त्यांच्या चेहºयावर निराशा पसरली होती.

 

टॅग्स :म्हाडा