Join us  

'मावळा'नं करुन दाखवलं, कोस्टल रोडच्या पहिल्या बोगद्याचे काम पूर्ण

By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2022 8:11 PM

महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा प्रकल्प सत्ताधारी शिवसेनेसाठी महत्त्वाचा आहे. त्यामुळे पहिला बोगदा पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने सोमवारी गिरगाव चौपाटीवर सोहळाच साजरा करण्यात आला

मुंबई - पालिकेच्या महत्वाकांक्षी कोस्टल रोड प्रकल्पातील महत्वाचा टप्पा सोमवारी पूर्ण झाला. या प्रकल्पांतर्गत प्रियदर्शनी पार्क ते गिरगांव चौपाटीपर्यंतच्या दोन बोगदे तयार करण्यात येणार आहेत. त्यापैकी पहिल्या बोगद्याचे काम सोमवारी दुपारी 'मावळा' या संयंत्राद्वारे पूर्ण करण्यात आले. एक वर्षाच्या विक्रमी वेळेत हे काम पूर्ण झाल्याचा दावा पालिका प्रशासनाने केला आहे.

महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा प्रकल्प सत्ताधारी शिवसेनेसाठी महत्त्वाचा आहे. त्यामुळे पहिला बोगदा पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने सोमवारी गिरगाव चौपाटीवर सोहळाच साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पर्यटन, पर्यावरण व पालकमंत्री आदित्य ठाकरे, पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी ऑनलाइन हजेरी लावली. तर महापौर किशोरी पेडणेकर, अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे स्वतः उपस्थित होत्या. 

'कोस्टल रोड' च्या कामाच्या अंतर्गत एक बोगदा उत्तर मुंबईकडे जाणारा तर दुसरा बोगदा दक्षिण मुंबईकडे येणारा आहे. प्रियदर्शनी पार्क ते गिरगांव चौपाटी या बोगद्याच्या खोदकामाला ११ जानेवारी २०२१ रोजी प्रियदर्शनी पार्क येथून सुरुवात करण्‍यात आली होती. या बोगद्याचा एक कि.मी.चा टप्‍पा ४ सप्टेंबर २०२१, तर दोन कि.मी.चा टप्‍पा २९ डिसेंबर २०२१ रोजी पूर्ण करण्यात आला. पहिल्‍या बोगद्यासाठी उर्वरित ७० मीटरचे खोदकाम सोमवारी पूर्ण करण्यात आले.

मुख्यमंत्र्यांकडून शाबासकी.. "मावळा” या शब्दाला साजेसे काम यंत्र आणि ते यंत्र हाताळणारे माझे सहकारी करीत आहेत. कोस्टल रोडच्या कामात ऊन, वारा, पाऊस, कोविड असे अनेक अडथळे आल्याने प्रकल्प पूर्ण होण्याबाबत शंका निर्माण झाली होती. या सर्व अडथळ्यांवर मात करून बोगद्याची दोन टोके समुद्राखालून जोडायचे अशक्य काम माझ्या टीमने करून दाखवले, याचा अभिमान वाटतो, असे गौरवोद्गार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काढले .  मुंबईच्या दृष्टीने महत्वाचा असलेल्या 'कोस्टल रोड'च्या कामांतर्गत वर्षभरात एका बोगद्याचे काम विक्रमी वेळेत पूर्ण झाले. शंभर टक्के काम नियोजित वेळेतच पूर्ण होईल, - इकबाल सिंह चहल ( आयुक्त, मुंबई महापालिका) 

* प्रिन्सेस स्ट्रीट उड्डाणपूल ते वांद्रे - वरळी सागरी सेतूच्या दक्षिण टोकापर्यंत १०.५८ लांबीचा कोस्टल रोड प्रकल्प* प्रकल्प पूर्ण होण्याची मुदत - डिसेंबर २०२३ * खर्च - १२ हजार ७२१ कोटी रुपये * प्रकल्पामध्ये ४+४ मार्गिका असणारे भरणीवरील रस्ते, पूल, उन्नत रस्ते,पार्किंग, हिरवळ, दोन बोगदे * प्रियदर्शिनी पार्क ते छोटा चौपाटी दरम्यान २.०७० किलोमीटर अंतराचा बोगदा दोन्ही बाजूने बांधण्यात येत आहे. * मरिन ड्राइव्हकडे जाणाऱ्या वाहतुकीसाठी वापरात येणाऱ्या पहिल्या बोगद्याचे खणन पूर्ण. 

टॅग्स :मुंबईरस्ते सुरक्षा