संतोष आंधळे, लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : राज्याच्या वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालयाने शुक्रवारी अधिष्ठाता, अध्यापक, निवासी डॉक्टर व इंटर्न्सना ॲप्रन घालणे बंधनकारक केल्याचे पत्रक काढले आहे. त्यात वैद्यकीय अभ्यासक्रम शिकविणाऱ्या महाविद्यालयांच्या अधिष्ठाता आणि प्राचार्यांना हे पत्र काढून काही विशेष सूचना केल्या आहेत.
त्यामध्ये रुग्णालय परिसरात कर्तव्यावर असताना कुणीही ॲप्रन परिधान न केल्यास पहिल्यांदा तोंडी समज द्यावी आणि दुसऱ्या वेळी लेखी स्पष्टीकरण घेण्यात यावे. तसेच ॲप्रन हातात, खांद्यावर किंवा बॅगेवर असणे प्रतिबंधित करण्यात आले आहे.
२२ फेब्रुवारी रोजी ‘करायचे काय? डॉक्टरच ॲप्रन घालत नाहीत’ या शीर्षकाखाली ‘लोकमत’मध्ये सर्वप्रथम वृत्त प्रसिद्ध करण्यात आले होते. त्यामध्ये राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी याबाबत चिंता व्यक्त केली होती. तसेच वैद्यकीय शिक्षण घेताना काही नियम काटेकोरपणे पाळावे लागतात. त्यातलाच अत्यंत महत्त्वाचा नियम म्हणजे ॲप्रन घालणे. डॉक्टर असो वा वैद्यकीयचे शिक्षण घेणारे विद्यार्थी सर्वांना हा नियम लागू असतो.
ॲप्रन का घालावा?
ॲप्रन घालण्यामुळे रुग्णालयात डॉक्टर कोण आणि अन्य कर्मचारी, रुग्ण आणि नातेवाईक यामधील फरक अधिक स्पष्ट होण्यास मदत होते. ॲप्रनचा वापर केवळ डॉक्टरांसाठीच नव्हे तर रुग्णांच्या दृष्टीनेही सोईस्कर ठरतो.
परिपत्रकात विशेष सूचनांचा समावेश
बहुतांश शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांशी संलग्न रुग्णालयांतील अधिष्ठाता, अध्यापक, निवासी डॉक्टर, एमबीबीएसचे विद्यार्थी ॲप्रन न घालताच रुग्णालयात वावरतात. आता मात्र ही ॲप्रनची सक्ती करताना वैद्यकीय महाविद्यालयांना काढलेल्या परिपत्रकात काही विशेष सूचना दिल्या आहेत. हे पत्रक वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालयाचे संचालक डॉ. अजय चंदनवाले यांच्या स्वाक्षरीने काढण्यात आले आहे.
काय आहेत सूचना
ॲप्रन घालून महाविद्यालयात व रुग्णालयात आदर्श व शिस्तबद्ध वातावरण तयार करावे.
ॲप्रन शुभ्र पांढरा, स्वच्छ नीटनेटका असावा. ॲप्रन परिधान केल्यानंतर त्याची सर्व बटणे लावलेली असावी. ॲप्रन सक्तीचे परिपत्रकाबाबत जागरूकता वाढवावी.
ॲप्रनचे महत्त्व आणि त्यामुळे होणारे फायदे याबाबतच्या सूचना देण्यात याव्यात.