Join us  

विद्यापीठात पहिल्यांदाच पीएचडी परीक्षा ऑनलाईन 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 03, 2018 5:37 PM

मुंबई विद्यापीठ पीएचडी प्रवेश परीक्षा (पेट) प्रथमच ऑनलाईन घेत असून ही परीक्षा 16 डिसेंबर, २०१८ रोजी होणार आहे.

मुंबई - मुंबईविद्यापीठ पीएचडी प्रवेश परीक्षा (पेट) प्रथमच ऑनलाईन घेत असून ही परीक्षा 16 डिसेंबर, २०१८ रोजी होणार आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाच्या २०१६ च्या नवीन निर्देशानुसार विद्यापीठाने नुकतीच पीएचडी व एमफील च्या प्रवेशाच्या संदर्भात कुलगुरूंचे निर्देश प्रसिद्ध केले होते. या आधारावर २०१८ ची पीएचडी व एमफील प्रवेशासाठी प्रवेश परीक्षा घेण्यात येणार आहे. सदर ऑनलाईन प्रवेश परीक्षेचे अर्ज ६ नोव्हेंबर रोजी सुरु होत असून ते २३ नोव्हेंबर पर्यंत असणार आहे. हे प्रवेश परीक्षेचे अर्ज ऑनलाईन असून याचे शुल्क देखील ऑनलाईनच्या माध्यमातून भरता येणार आहे. सदर पेट परीक्षेचे प्रवेश पत्र १० डिसेंबर पासून उपलब्ध होतील. 

पेट परीक्षेचे अर्ज फक्त ऑनलाईन असतील विद्यार्थ्यांना त्याची कोणतीही प्रत विद्यापीठात जमा करण्याची आवश्यकता नाही . परंतु सदर अर्जाची प्रिंटआउट पुढील संदर्भासाठी काढून ठेवण्यात यावी. या पेट परीक्षेचे अर्ज भरताना कोणतेही कागदपत्र सादर करण्याची आवश्यकता नाही. विद्यार्थ्यांनी मात्र प्रवेश पात्रता पाहूनच प्रवेश अर्ज भरणे आवश्यक आहे. ही परीक्षा ४ विद्याशाखामधून ७८ विषयांमध्ये घेतली जाणार आहे. सदरचे विषय विद्यापीठाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. हे ऑनलाईन अर्ज विद्यापीठाच्या www.mu.ac.in या संकेतस्थळावर ६ नोव्हेंबर पासून उपलब्ध असणार आहेत. ही परीक्षा ऑनलाईन असून संशोधन पद्धती व विद्यार्थ्याचा पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या विषयावर आधारित असेल.

टॅग्स :मुंबईविद्यापीठपरीक्षा