Join us  

देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच समुद्राखालून सर्वात लांब केबल टाकून घारापुरी बेटाचं विद्युतीकरण

By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2018 5:13 PM

महावितरणच्या वतीने देशाच्या इतिहासात प्रथमच समुद्र तळामधून सर्वात लांब केबल टाकून विद्युतीकरण करण्यात आलेल्या घारापुरी बेटाच्या विद्युतीकरणाचा लोकार्पण सोहळा आज गुरुवार २२ फेब्रुवारीला सायं. ६ वाजता घारापुरी बेटावर (शेतबंदर) येथे आयोजित करण्यात आला आहे.

मुंबई- महावितरणच्या वतीने देशाच्या इतिहासात प्रथमच समुद्र तळामधून सर्वात लांब केबल टाकून विद्युतीकरण करण्यात आलेल्या घारापुरी बेटाच्या विद्युतीकरणाचा लोकार्पण सोहळा आज गुरुवार २२ फेब्रुवारीला सायं. ६ वाजता घारापुरी बेटावर (शेतबंदर) येथे आयोजित करण्यात आला आहे. या प्रकल्पाचे लोकार्पण ज्येष्ठ निरुपणकार पद्मश्री डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या हस्ते होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राहणार आहेत. यावेळी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे, केंद्रीय अवजड उद्योगमंत्री अनंत गीते, पर्यटन व रोजगार हमी योजना मंत्री जयकुमार रावल, रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण, ऊर्जा व पर्यटनचे राज्यमंत्री मदन येरावार आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.७० वर्षांनंतर प्रथमच या बेटावर वीज पोहोचली असून, याकामी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रेरणेने कामास गती मिळाली. तसेच ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी याबाबत विशेष लक्ष दिले. तर महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक संजीव कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली इतर अधिकाऱ्यांनी हा प्रकल्प पूर्ण केला. घारापुरी बेटाच्या विद्युतीकरणाकरता केंद्र व राज्य शासनाच्या विविध विभागाच्या परवानग्या मिळाल्यानंतर प्रत्यक्षात फेब्रुवारी २०१७ मध्ये या कामाची सुरुवात झाली होती.यामध्ये प्रामुख्याने २२ केव्ही, सिंगल कोअर केबल (३+१अतिरिक्त केबल) समुद्राखालून ७.५ किमी टाकण्याचे काम करण्यात आले आहे. महावितरणामार्फत घारापुरी बेटास या सबमरीन केबलमार्फत देण्यात आलेला हा वीजपुरवठा पनवेल विभागातील टी. एस. रेहमान या उपकेंद्रातून दिला आहे. तसेच घारापुरी बेटावर विद्युत पुरवठा देण्यासाठी ७.५ किमीची २२ केव्ही उच्चदाब वीज वाहिनी टाकण्यात आलेली आहे. घारापुरी बेटावरील शेतबंदर, मोराबंदर व राजबंदर या तीन वाड्यांवर प्रत्येकी एक ट्रान्सफॉरमर (रोहित्र) बसवण्यात आले आहेत. सध्या १६४ हून अधिक कुटुंबांनी व व्यावसायिकांनी घारापुरी बेटावर वीजजोडणी घेतली आहे.