Join us

मुंबईत नव्या वर्षातील पहिले दुहेरी यशस्‍वी प्रत्यारोपण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2021 04:07 IST

मुंबई : मुलुंड येथील खासगी रुग्णालयात २०२१ मधील पहिले दुहेरी अवयव प्रत्‍यारोपण यकृत व मूत्रपिंड यशस्‍वी झाले. ही यशस्‍वी ...

मुंबई : मुलुंड येथील खासगी रुग्णालयात २०२१ मधील पहिले दुहेरी अवयव प्रत्‍यारोपण यकृत व मूत्रपिंड यशस्‍वी झाले. ही यशस्‍वी शस्‍त्रक्रिया कोविड महामारी सुरू झाल्‍यापासून पहिल्‍या संयोजित यकृत व मूत्रपिंड प्रत्‍यारोपणाशी संबंधित आहे. रुग्‍णाला या आठवड्यामध्‍ये डिस्‍चार्ज देण्‍यात आला आहे. ४५ वर्षीय ब्रेन डेड मुंबईकराच्‍या नातेवाइकांनी २२ जानेवारी २०२१ रोजी अवयव दान करण्‍याला संमती दिल्‍यानंतर हे यश शक्‍य झाले.

दाता असलेल्या व्यक्तीचा कॅटास्‍ट्रोफिक स्‍ट्रोकमुळे मृत्‍यू झाला. रुग्‍णाला ब्रेन डेड घोषित करण्‍यात आल्‍यानंतर इंटेन्सिव्हिस्‍ट्स व वैद्यकीय सामाजिक कार्यकर्त्‍यांनी रुग्‍णाची पत्‍नी व आईसोबत अवयव दानाच्‍या शक्‍यतेबाबत चर्चा केली. या रुग्णाच्या नातेवाइकांनी अवयव दानाला संमती दिली. रिट्रायव्‍ह हृदय, यकृत, मूत्रपिंड, त्‍वचा व डोळ्यांनी अंतिम पातळीवर ऑर्गन फेल्युअरने पीडित विविध रुग्‍णांमध्‍ये नवीन आशा निर्माण केली. ही महिला रुग्‍ण अंतिम टप्‍प्‍यातील यकृत व मूत्रपिंड फेल्युअरने पीडित होती. प्राप्‍तकर्ता रुग्‍ण ६ वर्षांपेक्षा अधिक काळापासून डायलिसिस उपचार घेत होती आणि ऑगस्‍ट २०२० पासून प्रतीक्षायादीमध्‍ये होती. हे प्रत्‍यारोपण तिच्‍यासाठी जीवनदायी ठरले आहे. यकृत प्रत्‍यारोपण व एचपीबी सर्जरी विभागाचे प्रमुख सर्जन डॉ. गौरव गुप्‍ता व सल्‍लागार डॉ. स्‍वप्‍निल शर्मा, तसेच वरिष्‍ठ नेफ्रोलॉजिस्‍ट्स डॉ. रमण मलिक व डॉ. रमेश महाजन यांनी रिट्रायव्‍हल व प्रत्‍यारोपण प्रक्रिया केली.

ज्येष्ठ नेफ्रोलॉजिस्‍ट डॉ. रमण मलिक म्‍हणाले, प्राप्‍तकर्ता रुग्‍ण मागील ६ वर्षांपासून डायलिसिस उपचार घेत होती. फॉलो-अप दरम्‍यान मला तिच्‍यामध्‍ये यकृत फेल्युअरची लक्षणे विकसित होत असल्‍याचे आढळून आले. अधिक तपासणी केली असता समजले की, ती यकृत व मूत्रपिंड फेल्युअरसह पीडित होती. त्‍यानंतर रुग्‍ण यकृत व मूत्रपिंड प्रत्‍यारोपणासाठी प्रतीक्षायादीमध्‍ये होती. शस्‍त्रक्रियेनंतर रुग्‍णाने आयसीयू व वॉर्डमधील तिच्‍या स्‍टेदरम्‍यान चांगला प्रतिसाद दिला. रुग्णाने जवळपास ५ ते ६ वर्षांनंतर नैसर्गिकरीत्‍या मूत्रविसर्जन करण्‍यास सुरुवात केली आहे. यकृत प्रत्‍यारोपण व एचपीबी सर्जरी विभागाचे सल्‍लागार व प्रमुख सर्जन डॉ. गौरव गुप्‍ता म्‍हणाले, एकाच वेळी यकृत व मूत्रपिंड प्रत्‍यारेापण करण्‍याचे आव्‍हान असते. आम्‍हाला अशा रुग्‍णांमध्‍ये रक्‍तस्‍त्रावाबाबत खूप काळजी घ्‍यावी लागते. त्‍यांचे मूत्रपिंड कार्यरत नसल्‍यामुळे फ्लूइड व इलेक्‍ट्रोलाइट संतुलन राखणे अत्‍यंत जटिल होऊन जाते. आम्‍ही प्रथम यकृत प्रत्‍यारोपण केले आणि त्‍यानंतर मूत्रपिंड प्रत्‍यारोपण केले. संपूर्ण शस्‍त्रक्रियेला ८ ते १० तास लागले आणि शस्‍त्रक्रियेला यश मिळाले.