Join us
Daily Top 2Weekly Top 5

डेक्कन क्वीनमधील व्हिस्टाडोम कोचची पहिली फेरी हाऊसफुल्ल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2021 04:10 IST

मुंबई : मध्य रेल्वेने मुंबई-पुणे मार्गावर डेक्कन एक्स्प्रेसनंतर आता डेक्कन क्वीनमध्येही १५ ऑगस्टपासून व्हिस्टाडोम कोच जोडला आहे. विशेष डेक्कन ...

मुंबई : मध्य रेल्वेने मुंबई-पुणे मार्गावर डेक्कन एक्स्प्रेसनंतर आता डेक्कन क्वीनमध्येही १५ ऑगस्टपासून व्हिस्टाडोम कोच जोडला आहे. विशेष डेक्कन क्वीन एक्स्प्रेसमधील व्हिस्टाडोम कोचच्या पहिल्या फेरीला प्रवाशांनी भरभरून प्रतिसाद दिला. इतकेच नव्हे तर हा व्हिस्टाडोम कोच १६ ऑगस्ट रोजीही पूर्णतः आरक्षित (हाऊसफुल्ल) झालेला आहे.

सध्या व्हिस्टाडोम कोच मुंबई-मडगाव जन शताब्दी विशेष ट्रेनमध्ये जोडलेला आहे. मुंबई-पुणे मार्गावर डेक्कन एक्स्प्रेसमध्ये २६ जूनपासून व्हिस्टाडोम कोच जोडण्यात आला होता, त्याला प्रवाशांनी चांगला प्रतिसाद दिला. त्यामुळे याच मार्गावर डेक्कन क्वीनमध्येही हा कोच जोडण्यात आला आहे.

व्हिस्टाडोम कोचमुळे मुंबई-पुणे मार्गावरील प्रवासी येथून जाताना जवळच्या माथेरान टेकडी (नेरळ जवळील), सोनगीर टेकडी (पळसदरी जवळील), उल्हास नदी (जांबरूंग जवळील), उल्हास व्हॅली, खंडाळा परिसर इत्यादीचा आणि लोणावळा आणि दक्षिण पूर्व घाट विभागातील बोगदे आणि धबधबे या निसर्गरम्य सौंदर्याचा आनंद घेऊ शकतात. विस्टाडोम कोचच्या मूलभूत विशेष वैशिष्ट्यांमध्ये वाइड विंडो पॅन आणि काचेचे छप्पर (टॉप), फिरण्यायोग्य खुर्ची आणि पुशबॅक खुर्च्या इत्यादीचा समावेश आहे.

व्हिस्टाडोम कोचमधून प्रवास करणाऱ्या एका प्रवाशाने रेल्वेच्या या उपक्रमाचे कौतुक केले. विशेषतः पावसाळ्यात घाटांची दृश्ये रुंद खिडक्यांसह अनुभवता येतात. ७५व्या स्वातंत्र्यदिनी व्हिस्टाडोम कोच जोडण्याचा रेल्वेचा उपक्रम खूप चांगला आहे आणि प्रवाशांच्या वतीने रेल्वेचे त्याबद्दल आभारी आहोत असे त्याने सांगितले.