Join us  

पहिल्याच पावसात महापालिकेची पोलखोल, नालेसफाईचे दावे ठरले फोल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2019 2:51 AM

मान्सूनच्या पहिल्याच मुसळधार सरींनी मुंबई महापालिकेचे नालेसफाईचे दावे खोटे ठरविले.

मुंबई  - मान्सूनच्या पहिल्याच मुसळधार सरींनी मुंबई महापालिकेचे नालेसफाईचे दावे खोटे ठरविले. अनेक उपाययोजनांनंतरही मुंबईतील अनेक सखल भाग पाण्याखाली गेले. मात्र पालिकेची लक्तरे वेशीवर टांगणाऱ्या रेडिओ जॉकी मलिष्काला पावसाळापूर्व कामांची माहिती देण्यात तत्परता दाखविणाºया प्रशासनाने शुक्रवारी मुंबईची तुंबापुरी होऊनही तोंड शिवलेले होते.मुसळधार पावसात मुंबईतील सखल भाग दरवर्षी पाण्याखाली जातात. अशा तब्बल २२५ ठिकाणी गेल्या मान्सूनमध्ये मुंबईत पाणी तुंबले होते. पावसाळ्यात पाण्याचा निचरा जलद गतीने होण्यासाठी अशा ठिकाणी खबरदारीच्या उपाययोजना पालिकेने आखल्या होत्या.मात्र अद्यापही १८० ठिकाणी पावसाळ्यात पाणी तुंबण्याचा धोका कायम आहे. ही भीती शुक्रवारी खरी ठरली.दादर-हिंदमाता, सायन रोड क्रमांक २४, अंधेरी सबवे, मिलन सबवे, मालाड सबवे हे नेहमीच तुंबणारे रस्ते आजदेखील पाण्याखाली गेले.त्यामुळे बस मार्गांत बदल करणे, मुंबईकरांची गैरसोय, वाहन चालकांना त्रास सहन करावा लागला.मात्र सकाळी ८.५२ वा. समुद्रात मोठी भरती आणि त्यानंतर नीप टाईड असल्याने काही ठिकाणी पाणी साचल्याचे स्पष्टीकरण प्रशासनाने दिले आहे. परंतु, मेनहोल्सचे झाकण खोलून आणि पंपाद्वारे पावसाच्या पाण्याचा निचरा करण्यात आल्याचा दावाही अधिकाऱ्यांनी केला आहे.मॅनहोलचे झाकण संबंधित महापालिका कर्मचाºयांव्यतिरिक्त इतर कोणीही उघडू नये, यासाठी जनजागृती करण्यात येत आहे, अशी माहिती ‘जी दक्षिण’ विभागाचे साहाय्यक आयुक्त देवेंद्रकुमार जैन यांनी दिली.

टॅग्स :पाऊसमुंबई