Join us  

अकरावीची पहिली गुणवत्ता यादी ९४ टक्के पार

By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2020 7:38 AM

बहुतांश महाविद्यालयांनी कट आॅफ नव्वद टक्क्यांच्या पार केल्याने पहिल्या यादीत मोठी चुरस निर्माण झाली.

मुंबई : दहावीचा निकाल यंदा मागील ५ वर्षांतील सर्वात जास्तचा निकाल आहे आणि याचा थेट परिणाम अकरावीच्या पहिल्या गुणवत्ता यादीवर झाला आहे. अकरावीच्या पहिली गुणवत्ता यादीचा कटआॅफ ९४ टक्क्यांहून अधिक आहे. नामवंत महाविद्यालयांच्या कटआॅफमध्ये गतवर्षीपेक्षा वाढ झाली आहे. बहुतांश महाविद्यालयांनी कट आॅफ नव्वद टक्क्यांच्या पार केल्याने पहिल्या यादीत मोठी चुरस निर्माण झाली.अर्ज केलेल्या २ लाख १२ हजार १५२ विद्यार्थ्यांपैकी पहिल्या यादीत निम्म्याहून अधिक १ लाख १७ हजार ५२० विद्यार्थ्यांचा प्रवेश निश्चित केला आहे. ४० हजार विद्यार्थ्यांना पहिल्या पसंतीचे महाविद्यालय मिळाले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अकरावी आॅनलाइन प्रवेशाला यंदा उशिराने सुरुवात झाली असली तरी या वर्षी तब्बल २ लाख १२ हजार १५२ विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत. यामध्ये कला शाखेसाठी २० हजार ११, वाणिज्य शाखेसाठी १ लाख २५ हजार ३५५, विज्ञान शाखेसाठी ६५ हजार ६४८ विद्यार्थ्यांनी तर एमसीव्हीसीसाठी १ हजार ३८ जणांनी अर्ज केले आहेत. त्यापैकी पहिल्या यादीत कला शाखेतील १२ हजार ५०२, वाणिज्य शाखेतील ६६ हजार १४० आणि विज्ञान शाखेतील ३७ हजार ९७६ आणि एचएसव्हीसीच्या ९०२ विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आला आहे. या विद्यार्थ्यांमध्ये प्रवेशासाठी मोठी चढाओढ झाली आहे.सर्वाधिक १ लाख ६ हजार ९७९ एसएससीच्या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला आहे. ३ हजार ७०५ सीबीएसई आणि आयसीएसईच्या ५ हजार ८६३ विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला आहे.पहिला पसंतीक्रम मिळालेल्या विद्यार्थ्यांनी प्रवेश घेणे बंधनकारकपहिला पसंतीक्रम मिळालेल्या विद्यार्थ्यांनी निवडलेल्या उच्च माध्यमिक विद्यालयात प्रवेश घेणे बंधनकारक आहे. जर प्रथम पसंतीक्रम मिळूनही प्रवेश घेतला नाही अथवा नाकारला तर अशा विद्यार्थ्यांना पुढील नियमित फेऱ्यांमध्ये संधी दिली जाणार नाही. त्यांना विशेष फेरीपर्यंत थांबावे लागेल. जर विद्यार्थ्यास घेतलेला प्रवेश रद्द करावयाचा असल्यास तशी विनंती संबंधित उच्च माध्यमिक विद्यालयास करावी व प्रवेश रद्द करून घ्यावा लागेल. त्यांची नावे पुढील नियमित फेऱ्यांसाठी प्रतिबंधित करण्यात येतील. अशा विद्यार्थ्यांना विशेष फेरीपर्यंत थांबावे लागेल, अशा सूचना शिक्षण उपसंचालक कार्यालयाने दिल्या. ३१ आॅगस्ट ते ३ सप्टेंबर या काळात प्रवेश घेणे बंधनकारक आहे.

टॅग्स :शिक्षण क्षेत्र