Join us  

आवाजावरून करण्यात येणाऱ्या चाचणीचा पहिला टप्पा पूर्ण

By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2020 2:30 AM

नेस्को काेविड केंद्रामध्ये कोरोना चाचणीचा नवा प्रयोग

मुंबई : गोरेगाव येथील नेस्को काेविड केंद्रामध्ये आवाजावरून करण्यात येणाऱ्या कोरोना चाचणीचे सुमारे दोन हजार नमुने गोळा करण्यात आले आहेत. अशा प्रकारच्या कोरोना चाचणीचा हा पहिलाच प्रयोग आहे; या नमुन्यांचा अभ्यास  करून पुढच्या महिन्यात अहवाल  सादर करण्यात येणार आहे. इस्राइल कंपनीच्या सहकार्याने करण्यात येणाऱ्या या चाचणीचा प्रयोग ऑगस्ट महिन्यात सुरू झाला आहे.

नेस्को केंद्राच्या प्रमुख डॉ. नीलम आंद्रे यांनी याविषयी सांगितले की, आवाजावरून करण्यात येणाऱ्या चाचणीसाठी २००० रुग्णांकडून चार हजार नमुने गोळा करण्यात आले आहेत. तर पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले की, आवाजावरून करण्यात येणाऱ्या चाचणीचे देशभरातून दहा हजार  नमुने जमा करण्यात आले आहेत.  या चाचणीचा अंतिम अहवाल  जानेवारी महिन्यात अपेक्षित आहे. या चाचणीचे सकारात्मक निष्कर्ष दिसून आल्यास पालिकेच्या रुग्णालयांमध्ये अशा स्वरूपाच्या कोरोना चाचण्या सुरू करण्याचा प्रशासनाचा मानस आहे. या माध्यमातून केवळ तीस सेकंदात कोरोना संसर्गाची माहिती मिळण्यास मदत होणार आहे.

अशी करण्यात आली चाचणीया चाचणीसाठी प्रत्येक रुग्णाने दोन वेळा आपल्या आवाजाचे नमुने दिले आहेत. यात पहिला नमुना हा रुग्ण कोरोना केंद्रात दाखल होताना घेतला, तर दुसरा नमुना हा रुग्ण कोरोनामुक्त झाल्यानंतर घेण्यात आला. रुग्णांकडून घेतलेले नमुने व्हॉकेलीस हेल्थ फॉर ॲनलिसिस या केंद्राला पाठविण्यात आले आहेत. याखेरीज, संशयित रुग्णांची कोरोना चाचणीही करण्यात आली आहे. या माध्यमातून दुहेरी पद्धतीने चाचणीची अचूकता पडताळण्यास मदत होईल, अशी माहिती डॉ. आंद्रे यांनी दिली.

टॅग्स :कोरोना वायरस बातम्या