मुंबई : मुंबईत १४ फेब्रुवारीपर्यंत लसीकरणाचा पहिला टप्पा पूर्ण करण्याचा मानस असून त्यासाठी सेव्हन हिल्स रुग्णालयात ११ वे लसीकरण केंद्र सुरू करण्यात आले आहे. कोरोना प्रतिबंधक लसीकरणासाठी दोन लाखांहून अधिक फ्रंटलाइन कर्मचारी आणि ३० लाख ज्येष्ठ नागरिकांनी ‘कोविन’ ॲपवर दुसऱ्या, तिसऱ्या टप्प्यासाठी नोंदणी केली आहे.
मुंबई महानगरपालिकेने पहिल्या टप्प्यात १.२५ लाख आरोग्य कर्मचाऱ्यांचे लसीकरण करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. मुंबई महानगरपालिकेच्या माहितीनुसार, आतापर्यंत झालेल्या लसीकरणाच्या सहा टप्प्यांत शहर उपनगरातील १० केंद्रांवर २६ हजार ६९४ कर्मचाऱ्यांपैकी १८ हजार १६९ कर्मचाऱ्यांनी लस घेतली आहे. सध्या मुंबईत ९० लसीकरण कक्ष असून या ठिकाणी ६८ टक्के आरोग्य कर्मचाऱ्यांनी लसीचा पहिला डोस घेतला आहे. त्यामुळे आता लवकरात लवकर लसीकरणाचा पहिला टप्पा पूर्ण करण्यात येणार असून दुसऱ्या व तिसऱ्या टप्प्याकरिता मनुष्यबळ सज्ज करण्यात येणार असल्याची माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली आहे. दुसऱ्या टप्प्यात पोलीस, सेना दल, आपत्कालीन कक्षातील कर्मचाऱ्यांना लस देण्यात येणार आहे.
लसीकरणाच्या प्रक्रियेत पहिल्यांदा कुणी डोस घेण्यास चुकल्यास पालिका प्रशासनातर्फे दुसऱ्यांदा त्या व्यक्तीस माहिती देण्यात येते. मात्र ही प्रक्रिया ऐच्छिक असल्याने कुणालाही त्यासाठी बळजबरी करण्यात येणार नसल्याचेही काकाणी यांनी नमूद केले.