नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या रिंगणात शेतकरी कामगार पक्ष उतरला आहे. आज शेकापने १२ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. सर्व १११ प्रभागांमध्ये उमेदवार उभे केले जाणार असून निवडणुकीसाठी १५ कलमी कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी जाहीर करण्यासाठी शेकापने सीबीडीमध्ये पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. निवडणूक पूर्ण ताकदीनिशी लढविणार असल्याचे यावेळी त्यांनी जाहीर केले. नवी मुंबईतील प्रकल्पग्रस्तांबरोबर येथील स्थानिकांनाही मूलभूत सुविधा मिळाव्यात. जनसामान्यांचे विविध प्रश्न सोडविण्यासाठी महापालिका निवडणुकीच्या रिंगणात शेकाप उतरला आहे. याचाच एक भाग म्हणून शेकापने मनपा निवडणुकीतील पहिल्या १२ उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. १११ प्रभागांमध्ये शेकाप उमेदवार उभे करणार असून येत्या १० दिवसांत उर्वरित उमेदवारांची यादी जाहीर करण्यात येणार आहे. सामाजिक कार्य आणि स्वच्छ प्रतिमा असलेल्या कार्यकर्त्यांना या पक्षामध्ये घेणार असून अशाच लोकांना उमेदवारी देण्यात येणार असल्याचे विवेक पाटील यांनी सांगितले.शेकाप प्रमुख १५ प्रश्न घेऊन निवडणुकीस सामोरे जाणार आहे. यामध्ये पालिकेतील भ्रष्टाचार, शैक्षणिक दर्जा, महिलांची असुरक्षितता, खालावलेली आरोग्य सेवा, अस्ताव्यस्त परिवहन सेवा, बेरोजगारी, प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न, मच्छीमारांचे प्रश्न, खेळाडूंसाठी मैदाने उपलब्ध करून देणे, गावठाणातील पाणीकपात थांबविणे, शैक्षणिक संस्थांकडून घेण्यात येणारी फी व डोनेशनवर कारवाई, झोपडीधारकांचे पुनर्वसन, पामबीच मार्गावरील पादचाऱ्यांची सुरक्षा, पालिकेतील कंत्राटी कामगारांचे व शाळांमधील कंत्राटी शिक्षकांच्या कायमस्वरूपी नोकरीचे प्रश्न सोडविणे या प्रश्नांचा समावेश आहे. यावेळी माजी नगरसेवक भरत जाधव, माजी नगरसेविका काशिबाई लांडगे व इतर मान्यवर उपस्थित होते. (प्रतिनिधी)
शेकापची पहिली यादी जाहीर
By admin | Updated: March 14, 2015 01:33 IST