Join us  

पशू-पक्ष्यांना दृष्टी देणारा देशातील पहिला अद्ययावत दवाखाना मुंबईत

By ऑनलाइन लोकमत | Published: June 02, 2019 3:48 AM

प्राणिमित्र महिला डॉक्टर; पशुवैद्यकीय क्षेत्रात नवे पर्व सुरू करण्याची इच्छा

सागर नेवरेकर 

मुंबई : देशात अनेक प्रजातींच्या पशू-पक्ष्यांना योग्य उपचारांअभावी डोळे गमावण्याची वेळ आल्याचे प्रमाण गेल्या काही वर्षांत वाढले आहे. मात्र, मुंबईतील एका प्राणिमित्र महिला डॉक्टरने पशू-पक्ष्यांना दृष्टी देणारा देशातील पहिला अद्ययावत दवाखाना चेंबूर येथे सुरू केला आहे. येथे सर्व प्रजातींच्या पशू-पक्ष्यांच्या डोळ्यांवर शस्त्रक्रिया केली जाते. 

पशू नेत्ररोग तज्ज्ञ डॉ. कस्तुरी भडसावळे यांनी ३ मार्च २०१९ रोजी चेंबूर येथे वेटरनरी (पशुवैद्यकीय) ऑप्थोमोलॉजी स्पेशालिटी क्लिनिक अ‍ॅण्ड ऑपरेशन थिएटर सुरू केले. भारतातील हा पहिला अद्ययावत पशुवैद्यकीय दवाखाना आहे. कस्तुरी यांनी २००४ साली मुंबईतील पशुवैद्यकीय महाविद्यालयातून पदवी आणि पदविका संपादन केली. दरम्यान, कस्तुरी यांच्या लक्षात आले की, भारतात पशुवैद्यकीय रुग्णालये भरपूर आहेत. मात्र, नेत्रहीन पशू-पक्ष्यांच्या डोळ्यांवर शस्त्रक्रिया करण्याची सोय उपलब्ध नाही. परिणामी, अनेक पशू-पक्षी जग पाहू शकत नाहीत. त्यामुळे त्यांनी पशुवैद्यकीय नेत्रचिकित्सक होण्याचे स्वप्न उराशी बाळगले. २००७ साली त्यांनी इस्रायल आणि अमेरिकेत पशुवैद्यकीय नेत्रचिकित्सा प्रशिक्षण घेतले.

२००९ मध्ये कस्तुरी या पतीसोबत ऑस्ट्रेलियात स्थायिक झाल्या. तेथे त्यांनी चार वर्षे डोळ्यांवरील अनेक शस्त्रक्रिया केल्या. त्यानंतर त्यांनी नोकरी सोडली आणि मेलबर्न, ऑस्ट्रेलिया येथे स्वत:चे नेत्रचिकित्सा सल्ला केंद्र सुरू केले. त्यानंतर २०१७ साली त्या मायदेशी परतल्या. डॉ. कस्तुरी भडसावळे यांनी सांगितले की, पशुवैद्यकीय नेत्रचिकित्सा दवाखान्यामध्ये श्वान, घोडे, विदेशी पाळीव प्राणी आणि पक्ष्यांचे उपचार केले जातात. देशातील पशुवैद्यकीय क्षेत्रात क्रांती घडवून आणण्याची योजना आम्ही आखत आहोत. संधी मिळाल्यास राज्यातील शासकीय उद्याने व अभयारण्यातील प्राण्यांसाठी काम करायला आवडेल आणि तो आमचा सन्मान असेल.

भारतात पशू-पक्ष्यांच्या डोळ्यांवर उपचार करणारे दवाखाने नाहीत. काही ठिकाणी छोटी-मोठी शस्त्रक्रिया केली जाते. त्यामुळे पशुवैद्यकीय दवाखाना सुरू करण्याची कल्पना सुचली. आमच्या दवाखान्यात आठवड्यातून तीन ते चार डोळ्यांच्या शस्त्रक्रिया केल्या जातात. रस्त्यांवरील पशू-पक्ष्यांच्या डोळ्यांच्या शस्त्रक्रिया करण्यासाठी एखादी नोंदणीकृत संस्था किंवा संघटना आली, तर माफक दर आकारले जातात.

टॅग्स :हॉस्पिटलमुंबई