Join us
Daily Top 2Weekly Top 5

शाळेचा पहिला दिवस घरातूनच, ऑनलाइन !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:07 IST

शिक्षकांची ५० टक्के उपस्थिती बंधनकारक; विदर्भातील शाळा २८ जूनपासून होणार सुरूलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव ...

शिक्षकांची ५० टक्के उपस्थिती बंधनकारक; विदर्भातील शाळा २८ जूनपासून होणार सुरू

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असला तरी विद्यार्थी सुरक्षिताता लक्षात घेऊन तूर्तास नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात ऑनलाइन करण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे. त्यामुळे उद्यापासून (मंगळवार, १५ जून) राज्यातील बरेच विद्यार्थी उन्हाळ्याच्या सुटीनंतर पुन्हा एकदा अभ्यासाला लागतील, मात्र ऑनलाइन पद्धतीनेच.

लॉकडाऊनमुळे मागील वर्षीही विद्यार्थ्यांना प्रवेशोत्सवाचा प्रत्यक्ष आनंद घेता आला नव्हता आणि यंदाही शिक्षक आणि वर्गशिक्षकांची तोंडओळख ऑनलाइनच करून घ्यावी लागेल. दरम्यान, याही परिस्थितीत नवीन वर्ग मित्र, नवीन शिक्षक यामुळे विद्यार्थ्यांमध्ये उत्साह कायम आहे. दरम्यान, विदर्भातील शाळांचे शैक्षणिक वर्ष २८ जूनपासून सुरू हाेईल.

शाळा सुरू झाल्यावर शिक्षकांना मात्र शाळांतील उपस्थिती बंधनकारक आहे. इयत्ता १० वी व १२ वीचा निकाल तयार करण्यासाठी मूल्यांकनाचे काम सुरू असून, मर्यादित वेळेत यंदा निकाल जाहीर करायचे असल्याने राज्यातील विदर्भासह इयत्ता दहावी, बारावीला शिकवणाऱ्या शिक्षकांची शाळांमध्ये १०० टक्के उपस्थिती गरजेची असल्याच्या सूचना शिक्षण संचालक दत्तात्रय जगताप यांनी दिल्या आहेत. तसेच इयत्ता पहिली ते नववी आणि अकरावीच्या शिक्षकांची ५० टक्के उपस्थिती शाळांमध्ये बंधनकारक असेल, असेही त्यांनी स्पष्ट केले. साेबतच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसोबत प्राथमिक, माध्यमिक मुख्याध्यापक आणि कनिष्ठ महाविद्यालयांचे प्राचार्य यांचीही उपस्थिती अनिवार्य आहे.

शिक्षण विभागाच्या सूचनांनुसार नवीन वर्षाची सुरुवात यंदा नवीन अभ्यासक्रमाने न होता उजळणीने होईल. मात्र, ती उजळणी कशी व कोणत्या घटकांची असावी, कोणत्या विद्यार्थ्यांची असावी, याबाबत शिक्षण विभागाकडून शाळा, मुख्याध्यापक, शिक्षकांना काहीच सूचना अद्याप आलेल्या नाहीत. त्यामुळे शाळेच्या पहिल्या दिवशी शैक्षणिक वर्षासंदर्भात काहीच आराखडा विद्यार्थ्यांसमोर सादर करता येणार नाही, अशी खंत मुख्याध्यापक व्यक्त करत आहेत.

* प्रवाहाबाहेर फेकल्या गेलेल्या विद्यार्थ्यांचा प्रश्न कायम

ज्या विद्यार्थ्यांकडे ऑनलाइन शिक्षण घेण्याची सोय नाही, ते विद्यार्थी गेल्या वर्षापासूनच ऑनलाइन शिक्षणाच्या प्रवाहाबाहेर फेकले गेले आहेत. स्थलांतरित झालेल्या विद्यार्थ्यांना डेटा पॅक, स्मार्टफोनअभावी ऑनलाइन शाळेच्या पहिल्या दिवसाला मुकावे लागणार आहे. अद्याप या विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षणाच्या प्रवाहात घेऊन येण्यासाठी काय करता येईल, याबद्दल शिक्षण विभागाने काहीच कार्यवाही केली नसल्याची नाराजी स्वयंसेवी संस्थांच्या प्रतिनिधींनी व्यक्त केली.

.........................