Join us
Daily Top 2Weekly Top 5

बी.कॉम.च्या परीक्षेचा पहिला दिवस सुरळीत, विद्यापीठाने सोडला नि:श्वास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2017 06:05 IST

मुंबई विद्यापीठात आॅनलाइन निकालांमध्ये बीकॉम अभ्यासक्रमाला विद्यार्थीसंख्या जास्त असल्याने निकालास अधिक वेळ लागला होता.

मुंबई : मुंबई विद्यापीठात आॅनलाइन निकालांमध्ये बीकॉम अभ्यासक्रमाला विद्यार्थीसंख्या जास्त असल्याने निकालास अधिक वेळ लागला होता. त्यामुळे विद्यापीठावर मोठ्या प्रमाणात टीकाही झाली होती. त्यानंतर नुकतेच ‘बीएमएस’ पेपरफुटी प्रकरण घडले. त्यामुळे बीकॉमच्या परीक्षेबाबत विद्यापीठामध्ये तणावाचे वातावरण होते. परंतु सोमवारी बीकॉमच्या पाचव्या सत्राची परीक्षा सुरळीतपणे पार पडली. या परीक्षेवेळी विद्यापीठाकडे एकही तक्रार दाखल न झाल्याने विद्यापीठाने आता नि:श्वास सोडला आहे.मुंबई विद्यापीठाच्या निकालांना लेटमार्क लागल्याने परीक्षाही उशिरा सुरू झाल्या आहेत. पुनर्मूल्यांकनाचे काम अद्याप पूर्ण झाले नसतानाही विद्यापीठाने परीक्षा सुरू केल्या आहेत. विद्यार्थी संघटनांनी परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी केली होती. पण, विद्यापीठाने परीक्षा पुढे ढकलण्यास नकार दिला. दरम्यान ‘बीएमएस’मध्ये पेपरफुटी प्रकरण घडले. त्यामुळे तणाव वाढला. त्यातच सोमवारी पाचव्या सत्राच्या परीक्षा सुरू झाल्या. मुंबई विद्यापीठांतर्गत घेण्यात येणाºया बीकॉमच्या परीक्षा २६३ केंद्रांवर पार पडल्या. या परीक्षेला ७५ हजारांहून अधिक विद्यार्थी बसले होते. पण, परीक्षेत कोणताही अनुचित प्रकार घडला नाही.‘बीएमएस’च्या पाचव्या सत्राची परीक्षा सुरू झाल्यानंतर तिसºया दिवशी बीएमएसचा पेपर फुटला. या प्रकरणानंतर विद्यापीठाचा ताण वाढला आहे. त्यामुळे बीकॉमच्या परीक्षेतील येणारी विघ्ने टाळण्यासाठी विद्यापीठाने डोळ्यांत तेल घातले आहे. परीक्षा सुरू होण्याआधी सर्व परीक्षा केंद्रांना सूचना पाठविण्यात आल्या होत्या. या सूचनांप्रमाणे परीक्षा सुरू झाल्यावर एक तास विद्यार्थ्याला वर्गाबाहेर पडता येणार नाही, असे नमूद केले होते.

टॅग्स :परीक्षाविद्यापीठ