Join us  

मुंबईत राबविली तृतीयपंथींसाठी पहिली कोरोना लसीकरण मोहीम

By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2021 11:42 AM

रोगप्रतिकारक शक्तीची कमतरता असल्याने धोका अधिक

मुंबई :  तृतीयपंथी गटातील अनेक सदस्यांची रोगप्रतिकारक शक्ती संपूर्ण क्षमतेने काम करत नसते व त्यांना काेराेना विषाणूचा संसर्ग होण्याचा धोका अधिक असतो, असे तज्ज्ञांचे मत आहे.  या पार्श्वभूमीवर माहीम येथील एस. एल. रहेजा हॉस्पिटलच्या उपक्रमातून तृतीयपंथींना लस देऊन त्यांच्यासाठी मुंबईतीली पहिली लसीकरण माेहीम राबवण्यात आल्याचे संस्थेच्या एक्झिक्युटिव्ह बोर्ड मेंबर लक्ष्मी नारायण त्रिपाठी यांनी सांगितले.

फोर्टिसची सहयोगी संस्था असलेल्या माहीम येथील एस. एल. रहेजा हॉस्पिटलने गौरव संस्थेच्या मदतीने तृतीयपंथींसाठी शहरातील पहिल्या कोरोना लसीकरण मोहिमेचे आयोजन रविवारी केले होते.  यावेळी त्रिपाठी यांनी उपस्थितांशी संवाद साधला. या उपक्रमांतर्गत ७० हून अधिक व्यक्तींना कोविशिल्डचा पहिला डोस देऊन त्यांचे लसीकरण करण्यात आले. नॅशनल काउन्सिल फॉर ट्रान्सजेन्डर पर्सन्सच्या सदस्य लक्ष्मी नारायण त्रिपाठी आणि झैनब जाविद पटेल यांनी यासाठी मोलाचे योगदान दिले.

यावेळी एस. एल. रहेजा हॉस्पिटल माहीमचे सीईओ डॉ. कुणाल पुनामिया म्हणाले, तृतीयपंथी समाजाला कोरोनाच्या काळात इतरांहून वेगळ्या आव्हानांना सामोरे जावे लागले आहे. आम्ही तृतीयपंथी चळवळीतील कार्यकर्त्यांशी संवाद साधत आहोत आणि मुंबईत या समाजासाठी आजवर अशा प्रकारचा कोणताही लसीकरण कार्यक्रम झालेला नाही, असे त्यांनी आम्हाला सांगितले. 

आम्हाला त्यांच्यापर्यंत पोहोचता आले व कोणताही समाजगट या आवश्यक सेवांपासून वंचित राहू नये याचा प्रयत्न केला आहे. कोणत्याही समाजाची आणि राष्ट्राची वाढ व्हायची असेल तर त्यासाठी समानता आणि विविधता या गोष्टी सर्वाधिक महत्त्वाचे आहे.  आरोग्यसेवा मिळणे हा प्रत्येक व्यक्तीचा अधिकार आहे आणि व्यापक पातळीवर समाजापर्यंत पोहोचून लोकांना कोरोनाच्या विरोधात आवश्यक ती सुरक्षा बहाल करणे हे आमचे उद्दिष्ट आहे. कोरोना विरोधातील लसीकरण हे सार्वजनिक आरोग्यासमोर उभ्या राहिलेल्या या संकटातून बाहेर येण्यासाठी उचललेले पहिले पाऊल आहे.

टॅग्स :कोरोना वायरस बातम्याकोरोनाची लस