Join us

ठाण्याच्या शेतकऱ्यांकडे प्रथमच येणार ‘भातरोवणी’ यंत्र

By admin | Updated: March 29, 2015 22:39 IST

खरीप हंगामातील भात हे कोकण विभागाचे प्रमुख पीक आहे. खाचरात तुंबलेल्या पाण्यात या भाताची मजुरांकडून लागवड केली जाते.

ठाणे : खरीप हंगामातील भात हे कोकण विभागाचे प्रमुख पीक आहे. खाचरात तुंबलेल्या पाण्यात या भाताची मजुरांकडून लागवड केली जाते. मात्र, या खरीप हंगामात ठाणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मजुरांऐवजी ‘भातरोवणी’ यंत्राद्वारे भाताची लागवड करता येणार आहे. कोकणातील जिल्ह्यांपैकी ठाणे जिल्ह्यात प्रथमच या यंत्राचा वापर केला जाणार आहे.ठाणे जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाद्वारे ‘भातरोवणी’ यंत्र जिल्ह्यातील क्रीयाशील बचत गटांना वाटप केले जाणार आहे. या यंत्राची सेवा देऊन त्या बदल्यात बचत गट संबंधित शेतकऱ्यांकडून पैसे घेणार आहे. रोजगार उपलब्ध करून देणारे व शेतकऱ्यांना सोयीचे ठरणारे भातरोवणी यंत्र खरेदीसाठी जिल्हा परिषदेने सुमारे ३० लाख रुपयांची तरतूद अंदाजपत्रकात केली आहे. केवळ, आंध्र प्रदेश आदी राज्यांत वापरले जाणारे यंत्र आता प्रथम ठाणे जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या सेवेसाठी उपलब्ध केले जाणार आहे. कापडावर ज्याप्रमाणे मशीनद्वारे शिलाई मारली जाते, त्याप्रमाणे शेतजमिनीमध्ये भातरोवणीचे काम या अत्याधुनिक यंत्राद्वारे केले जात आहे. यामुळे शेतीकामासाठी जाणवणाऱ्या मजुरांच्या टंचाईवरही मात करता येणार आहे. त्यातून गटातील सभासदांना रोजगार मिळणार असून जिल्ह्यातील शेतकऱ्यांना शेतीसाठी आधुनिक यंत्राचा वापर केल्याचे समाधानही मिळणार आहे. (प्रतिनिधी)