Join us
Daily Top 2Weekly Top 5

खंडणीसाठी गोळीबार

By admin | Updated: November 29, 2015 02:51 IST

मालाड पूर्वच्या कुरार परिसरात एका बांधकाम प्रकल्प सुरू असलेल्या ठिकाणी शुक्रवारी रात्री अज्ञाताने गोळीबार केला. त्यामध्ये रिक्षाचालक गंभीर जखमी झाला असून, हल्लेखोर

मुंबई : मालाड पूर्वच्या कुरार परिसरात एका बांधकाम प्रकल्प सुरू असलेल्या ठिकाणी शुक्रवारी रात्री अज्ञाताने गोळीबार केला. त्यामध्ये रिक्षाचालक गंभीर जखमी झाला असून, हल्लेखोर घटनास्थळी खंडणीची मागणी करणारी चिठ्ठी टाकून पसार झाले. तारकेश्वर संजीत सिंह (वय ४०) असे जखमीचे नाव असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हल्लेखोरांचा शोध लावण्यात पोलिसांना अद्याप यश आलेले नाही. कुरारच्या दप्तरी रोड परिसरातील शिवाजीनगरमध्ये भोला साई डेव्हलपर्सकडून मोठा प्रकल्प उभारला जात आहे. संजीत सिंह यांचा भाऊ त्या ठिकाणी सुरक्षा रक्षकाचे काम करीत आहे. शुक्रवारी रात्री साडेनऊच्या सुमारास दोघे भाऊ आणि अन्य एक व्यक्ती बोलत उभे होते. त्या वेळी एका अनोळखी तरुणाने सिंह यांच्या दिशेने रिव्हॉल्व्हर रोखत गोळ्या झाडल्या आणि त्यांच्या दिशेने एक चिठ्ठी फेकून निघून गेला. अकस्मात घडलेल्या या घटनेने परिसरात घबराट निर्माण झाली. दोघांनी पोलिसांना कळवित जखमीला रुग्णालयात नेले. पोलिसांनी चिठ्ठी ताब्यात घेतली असता त्यामध्ये १० लाखांची पूर्तता करावी, असा मजकूर लिहिलेला होता. त्यामुळे खंडणीसाठी हा गोळीबार करण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. (प्रतिनिधी)