Join us

रिझर्व्ह बँकेच्या इमारतीला आग

By admin | Updated: September 5, 2015 02:06 IST

वांद्रे पूर्वेकडील तळमजला अधिक आठ मजली इमारतीच्या रिझर्व्ह बँकेच्या सर्वात वरच्या मजल्याला आग लागण्याची घटना शुक्रवारी सकाळी घडली

मुंबई : वांद्रे पूर्वेकडील तळमजला अधिक आठ मजली इमारतीच्या रिझर्व्ह बँकेच्या सर्वात वरच्या मजल्याला आग लागण्याची घटना शुक्रवारी सकाळी घडली. या दुर्घटनेत वित्तहानी झाली असून, अग्निशमन दलाच्या दोन साहाय्यक केंद्र अधिकाऱ्यांना किरकोळ मार लागला आहे.महापालिकेच्या नियंत्रण कक्षाकडून मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी ८:२९ वाजता रिझर्व्ह बँकेच्या सर्वात वरच्या मजल्याला आग लागली. प्रथम एक नंबरची वर्दी असलेली ही आग ८:४८ वाजता दोन नंबरची वर्दी म्हणून घोषित करण्यात आली. आगीची वार्ता कळताच अग्निशमन दलाच्या वतीने घटनास्थळी आठ फायर इंजीन, सहा पाण्याचे टँकर, एक रुग्णवाहिका आणि वरिष्ठ अग्निशमन अधिकाऱ्यांना धाडण्यात आले.शर्थीच्या प्रयत्नांती अग्निशमन दलाला सकाळी १०.४० वाजता आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले. तर ११:१५ वाजता आग पूर्णपणे विझली. घटनास्थळी दोन साहाय्यक केंद्र अधिकाऱ्यांना किरकोळ मार लागला असून, त्यांच्यावर घटनास्थळावरील रुग्णवाहिकेत उपचार करण्यात आले. (प्रतिनिधी)