Join us  

मालाडमध्ये आगीत कामगाराचे घर भस्मसात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2018 4:41 AM

चाळीस वर्षांपूर्वी बांधलेल्या येथील पाच इमारतींत पालिकेच्या विविध आस्थापनांत काम करणारी ७२ कुटुंबे राहतात.

मुंबई : मालाड जलाशय टेकडीच्या कामगार वसाहतीकडे पालिकेच्या देखभाल विभागाने केलेल्या दुर्लक्षामुळे येथे राहत असलेल्या कामगारांचे घर गेल्या सोमवारी लागलेल्या आगीत जळून भस्मसात झाले. या जागरूक कुटुंबाने आगीतून आपली सुखरूप सुटका केल्याने हानी टळली. मात्र येथील सोसायटीतील वायरिंगचीदेखील अवस्था दयनीय असून येथे पुन्हा स्पार्क होऊन आग लागेल, अशी भीती असून आम्ही जीव मुठीत घेऊन राहत असल्याची माहिती येथील नागरिकांनी दिली.

चाळीस वर्षांपूर्वी बांधलेल्या येथील पाच इमारतींत पालिकेच्या विविध आस्थापनांत काम करणारी ७२ कुटुंबे राहतात. या सोसायटीकडे पालिकेच्या देखभाल विभागाचे सतत दुर्लक्ष होत आहे़ परिणामी या परिसराला बकाल स्वरूप आले आहे. गेली दीड वर्षे सोसायटीच्या साफसफाईसाठी झाडूवालाच येत नाही, असा आरोप नागरिकांनी केला. आम्ही दरमहा आमच्या पगारातून भाडे आणि इतर सुविधांसाठी चार ते साडेचार हजार रुपये देतो. मात्र आमच्या सोसायटीकडे पालिका प्रशासन दुर्लक्ष करते, असा आरोप त्यांनी केला.बोरीवलीच्या आर मध्य वॉर्डमध्ये पाणी खात्यात काम करणारे कामगार सुकप्पा यल्लपा कुंचीकोरवे हे गेली १९ वर्षे येथील इमारत क्रमांक सी दोन तळमजल्यावर राहतात. या इमारतीच्या तळमजल्यावर असलेल्या इलेक्ट्रिक बॉक्समधून स्पार्क येत असून आग लागण्याची शक्यता असल्याचे त्यांनी देखभाल खात्याचे साहाय्यक अभियंता शेख यांच्या निदर्शनास आणून दिले होते. मात्र देखभाल विभागाने टेंडर दिले आहे, स्टाफ नाही, अशी उत्तरे त्यांनी दिल्याची माहिती कुंचीकोरवे यांनी दिली. स्पार्क लागून आगीने घराला वेढा घातला. झोपलेली पत्नी, तीन मुले व एका मुलीला सुखरूप घरातून बाहेर काढले. मात्र घराचे होतेचे नव्हते झाले. सारे सामान, कपडे, भांडी, एसी जळून खाक झाले. त्यामुळे सुमारे तीन लाखांचे आर्थिक नुकसान झाले असून प्रशासनाने घर पूर्वीप्रमाणे दुरुस्त करून घ्यावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.दरम्यान, या घटनेप्रकरणी आमदार सुनील प्रभू यांनी पालिका आयुक्त अजय मेहता यांची भेट घेणार असल्याचे सांगितले. तर देखभाल खात्याचे साहाय्यक अभियंता शेख यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, या सोसायटीचे संपूर्ण वायरिंग बदलायचे असून याला पालिकेच्या प्रक्रियेप्रमाणे किमान तीन महिने लागतील. तर पालिकेत नव्याने भरती झाल्यावर येथे सफाई कामगार देण्यात येतील.

टॅग्स :आगमुंबई