मुंबई : माध्यमांसह समाजातील सर्वच स्तरांतील संस्था आणि लोकांनी दिवाळी पर्यावरणपूरक साजरी करण्याचे केलेले आवाहन फळाला येत असल्याचे चित्र मुंबईत दिसून आले. या आवाहनाचा परिणाम असा, की संपूर्ण मुंबईत फटाक्यांमुळे भाजण्याच्या प्रकरणांमध्ये कमालीची घट झालेली दिसून येत आहे. यंदा अवघ्या ५२ जणांना फटाक्यांमुळे भाजल्याच्या घटना घडल्या, पैकी केवळ दोघांनाच रुग्णालयात दाखल करण्यात आले. गेल्यावर्षी हा आकडा ८० ते १००च्या आसपास होता.दिवाळी म्हणजे फटाके, फराळ आणि आप्तेष्टांच्या भेटीगाठी असे समीकरणच आहे. सर्वांनीच दिवाळी मोठ्या उत्साहात साजरी केली. पण ही दिवाळी यंदा पर्यावरणपूरक असल्याचेच दिसून आले. फटाके उडवताना काळजी न घेतल्याने भाजल्याच्या केवळ ५२ घटना घडल्या, पैकी सायन रुग्णालयात २० टक्के भाजलेले दोन रुग्ण दाखल असून, त्यांना देखील पुढच्या आठवड्यात सुटी मिळण्याची शक्यता आहे. दिवाळीमध्ये फटाके उडवताना लहान मुलांकडे लक्षात द्या, असा सल्ला डॉक्टरांसह पर्यावरणवाद्यांनीही दिवाळीआधीच दिला होता. नेहमीप्रमाणे उत्साहात फटाके उडवण्यात सगळ््यात पुढे असणाऱ्या लहान मुलांना देखील भाजण्याच्या घटनांपासून रोखण्यात यंदा यश आले आहे. पालकांमध्ये आलेली जागरूकता देखील यासाठी महत्त्वाची ठरली आहे. विशेष म्हणजे दिवाळीच्या दिवसांत एकही गंभीर अथवा अत्यवस्थ रुग्ण नायर, केईएम, सायन आणि जे. जे. रुग्णालयात दाखल झालेला नाही, ही देखील सकारात्मक बाब म्हणावी लागेल.सायन रुग्णालयामध्ये ५ ते २० वयोगटातील १७ जण उपचारासाठी आले होते. पैकी २ जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रुग्णालयात आलेल्यांपैकी बहुतांश पुरुष होते. त्यांच्या हात, पाय, चेहरा आणि छातीला किरकोळ भाजले होते. या सर्वांवर प्राथमिक उपचार करून त्यांना सोडून देण्यात आले. मात्र दोन जण २० टक्के भाजलेले आहेत. त्यांच्यावर अद्यापही रुग्णालयात उपचार सुरू आहेत.या दोघांना हाताला आणि चेहऱ्यावर जखमा झाल्या आहेत. भाजण्याचे प्रमाण कमी असल्यामुळे त्यांना अतिदक्षता विभागात न ठेवता वॉर्डमध्येच ठेवण्यात आलेले आहे. पुढच्या तीन ते चार दिवसांत त्यांच्या जखमा भरायला सुरुवात होईल. यानंतर आठवडाभरात त्यांना डिस्चार्ज मिळू शकतो, अशी माहिती सायन रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. अविनाश सुपे यांनी दिली. केईएममध्ये फटाक्यामुळे किरकोळ जखमी झालेले १५, तर नायर रुग्णालयामध्ये १२ जण आले होते. मात्र कोणालाही गंभीर जखम नसल्याने त्यांना प्राथमिक उपचार देऊन घरी सोडण्यात आले.जे. जे. रुग्णालयामध्ये ८ जण उपचारांसाठी आले होते. मात्र त्यापैकी कोणालाही गंभीर जखमा झालेल्या नव्हत्या. विशेष म्हणजे पुरेशी जनजागृती झाल्याने कोणाच्याही डोळ्याला गंभीर जखम झालेली यंदा आढळून आली नसल्याचे जे. जे. रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. तात्याराव लहाने यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
फटाक्यांचा ‘फ टका’ सौम्य !
By admin | Updated: October 27, 2014 01:06 IST