नवी मुंबई : नेरुळ सेक्टर १८मधील पामबीच लगतच्या सागर दर्शन सोसायटीमध्ये सोमवारी दुपारी आग लागली. १५ मजली इमारतीच्या सातव्या मजल्यावरील ७०१ क्रमांकाच्या फ्लॅटमध्ये आग लागली असूण सुदैवाने यात कोणीही जखमी झाले नाही. मात्र या आगीत फ्लॅटमधील विद्युत उपकरणे व फर्निचरचे साहित्य जळून खाक झाली. दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास सातव्या मजल्यावर रविंद्रसिंग सोनी यांचा ७०१ क्रमांकाचा फ्लॅट आहे. दुपारी बंद घरातून धूर येत असल्याचे रहिवाशाच्या निदर्शनास आले. त्यांनी तत्काळ अग्निशमन दलाला आगीची दिली. त्यानुसार नेरुळ, वाशी आणि सिबीडी येथील अग्निशमन बंब घटनास्थळी दाखल झाले होते. एक तासाच्या अथक प्रयत्नानंतर या आगीवर नियंत्रण मिळवले. या घटनेत सिंग यांच्या घराच्या किचन व हॉलमधील विद्युत उपकरणे व फर्निचर जळाले. तर वेळीच आग आटोक्यात आल्याने दोन बेडरुम आगीपासून बचावल्या. किचनमध्ये शॉर्ट सर्किटने लागल्याचा अंदाज आहे. (प्रतिनिधी)
नेरूळमध्ये इमारतीला आग
By admin | Updated: December 16, 2014 01:50 IST